विवाहापूर्वी वधू-वरांचे समुपदेशन करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री

गोव्यात दळणवळण बंदीच्या काळातही प्रतिदिन एक घटस्फोटाचे प्रकरण नोंद

नीलेश काब्राल, कायदामंत्री

पणजी, ५ जून (वार्ता.) – विवाहापूर्वी वधू-वर यांचे समुपदेशन करण्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार असल्याची माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी लग्नापूर्वी वधू-वरांंचे समुपदेशन करणार असल्याचे घोषित केले होते आणि राज्यशासनाच्या या निर्णयाला भाजपने विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव रहित केल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी ही माहिती दिली.

कायदामंत्री नीलेश काब्राल पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात मागील काही वर्षे दांपत्यांच्या घटस्फोटांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने विवाहापूर्वी वधू-वरांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी असूनही एकूण ३५० म्हणजेच सरासरी प्रतिदिन एका दांपत्याने घटस्फोट घेतला.’’