७ जूनपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत दळणवळण बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसिद्ध !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुख्यमंत्री कार्यालयाने ५ जून या दिवशी पहाटे महाराष्ट्रातील दळणवळण बंदी उठवण्याची सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आठवड्याचे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) आणि ऑक्सिजन खाटा यांची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यांत निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. ही अधिसूचना ७ जूनपासून लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रशासकीय पातळीवरील निर्बंधांची कार्यवाही करण्यात येईल. ५ टप्प्यांत निर्बंध शिथिल करण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील शहर आणि जिल्हे येथे मॉल, चित्रपटगृह आणि दुकाने सुरळीत चालू रहातील.

पहिला टप्पा

नगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ (१० जिल्हे) – येथे लोकल सेवा पूर्ववत् होईल; मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल. व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स यांनाही अनुमती असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत् होईल. खासगी कार्यालये चालू होतील, तर शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने चालू होतील.

खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यांवर कोणतीही बंधने नसतील. जमावबंदी नसेल.

दुसरा टप्पा

हिंगोली आणि नंदुरबार – येथे ५० टक्के क्षमतेने उपाहारगृहे, मॉल आणि चित्रपटगृह चालू रहातील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक चालू रहातील. बांधकाम आणि कृषी या क्षेत्रांतील कामे पूर्ण चालू रहातील. जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर हेही ५० टक्के क्षमतेने चालू असेल. बसगाड्या बैठक क्षमतेइतक्या पूर्णपणे चालू असतील. जिल्ह्याच्या बाहेर खासगी वाहन, बसगाड्या, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना अनुमती आहे; मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

तिसरा टप्पा

मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, धाराशिव, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम – येथे अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते दुपारी २ पर्यंत चालू रहातील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार दुकाने बंद रहातील. मॉल्स आणि चित्रपटगृह बंद रहातील. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी २ नंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार, रविवार उपाहारगृहे बंद रहातील.

सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत चालू रहातील. खासगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील. इनडोअर खेळले जाणारे खेळ बंद रहातील. चित्रपटांच्या चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये अनुमती असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवारपर्यंत ५० टक्के क्षमतेने दुपारी २ पर्यंत अनुमती राहील. २ नंतर जमावबंदी असेल.

विवाहसोहळे ५० जणांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. अंत्यसंस्कारांना २० जणांची उपस्थिती असेल. इतर बैठकांना ५० टक्के उपस्थिती चालेल. कृषी कामे, ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामे यांना दुपारी २ वाजेपर्यंत अनुमती राहील.

चौथा टप्पा

पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग – अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) चालू रहातील. इतर दुकाने, चित्रपटगृह, मॉल बंद रहातील. उपाहारगृहांमध्ये पार्सल सेवा चालू राहील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ चालू रहातील (सोमवार ते शुक्रवार). अत्यावश्यक सेवेतील खासगी आणि शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहील. बाहेर खेळले जाणारे खेळ सकाळी ५ ते ९ (सोमवार ते शुक्रवार) पर्यंत चालू रहातील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुमती नसेल. विवाह सोहळ्यासाठी २५, तर अंत्यसंस्कारांसाठी २० लोकांची उपस्थिती बंधनकारक असेल. राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के क्षमतेने घ्याव्यात. कामगारांच्या रहाण्याची सोय असल्यास बांधकामे चालू रहातील. कृषी कामे दुपारी २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) चालू रहातील. ई कॉमर्स अत्यावश्यक सेवेसाठी चालू राहील. केशकर्तनालय आणि जिम ५० टक्के क्षमतेने चालू रहातील; पण तेथे वातानुकूलित यंत्र वापरता येणार नाही. बसगाड्या ५० टक्के क्षमतेने चालू राहील. उभे राहून प्रवास करण्याची अनुमती नसेल. संचारबंदीचे नियम लागू रहातील.

पाचवा टप्पा

रुग्णसंख्या वाढल्यास त्या जिल्ह्याचा यात समावेश होईल.