नागपूर – शहरातील पांढराबोडी येथील एक आई काही मासांच्या स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन त्या आईवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी त्या महिलेला कह्यात घेऊन तिला सूचनापत्र दिले आहे. अल्पवयीन बाळाच्या सुरक्षेसाठी त्याला बाल न्याय मंडळापुढे उपस्थित करण्यात येणार आहे.
या व्हिडिओमध्ये एका महिला सासूसमवेत वाद घालत असतांना ती स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करत असल्याचे दिसून आले होते. (घरातील भांडणाचा राग बाळावर काढण्याचा हा प्रकार गंभीर आहे. यातून घरातील वातावरण निकोप रहाणे आणि कुटुंबातील घटना संयमाने हाताळता येणे यांसाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते. – संपादक) ही घटना ८ दिवसांपूर्वीची आहे. पोलिसांनी या बाळाला कह्यात घेतले आहे. बाळ सुखरूप आहे. आईसह कुटुंबातील लोकांचे समुपदेशन करण्यात येत आहे, तसेच बाळासंबंधाने कायदेशीर कर्तव्ये, दायित्व आणि अधिकार यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनेला बोलावण्यात आले होते.