पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेपत्रक घोषित !

राज्यभरात यापूर्वी रुग्णवाहिकांसाठी भाडेपत्रक घोषित होऊनही चालकांकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे केवळ भाडेपत्रक घोषित न करता अवाजवी शुल्क आकारणार्‍यांवर कठोर कारवाई होणेही महत्त्वाचे आहे !

पुणे – नागरिक आणि वैद्यकीय सेवा पुरवणार्‍या संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन अवाजवी भाडे आकारणी टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेपत्रक घोषित केले आहे. हे नवे भाडेपत्रक पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लागू रहाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

सर्व रुग्णवाहिकांमध्ये वातानुकूलित यंत्रणा असल्याचे गृहीत धरून रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार हे भाडेपत्रक तयार केले आहे. २५ किलोमीटर किंवा २ घंट्यांसाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार ६०० ते ९५० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२ ते १४ रुपये आणि प्रतितास प्रतीक्षेसाठी १०० ते १५० रुपये भाडे ठरवले आहे. हा भाडे दर रुग्ण रुग्णवाहिकेत बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी असून परतीसाठी किलोमीटरनुसार भाडे लागू असेल. हे भाडेपत्रक रुग्णवाहिकेच्या अंतर्गत भागात प्रदर्शित करावे, असेही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.