कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका शहरातील एका रुग्णालयामध्ये रुग्णाची आर्थिक स्थिती पाहून उपचार करण्याविषयी आलेला कटू अनुभव

एका शहरातील माझ्या काकांचा मोठा मुलगा आणि काकू यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना अन्य जिल्ह्यातील आमच्या ओळखीच्या एका आधुनिक वैद्यांकडे उपचारासाठी घेऊन गेलो. त्या आधुनिक वैद्यांनी ‘सिटी स्कॅन’ करण्यास सांगितले. त्याचा अहवाल आल्यानंतर दोघांनाही ते रहात असलेल्या शहरातील  एका निमशासकीय रुग्णालयामध्ये भरती केले. या रुग्णालयामध्ये रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीनुसार (सामान्य (जनरल), महनीय (व्हीआयपी) आणि अतीमहनीय (व्हीव्हीआयपी)) उपचार दिले जातात. आमच्या घरातील एका सदस्याचे नुकतेच निधन झाल्याने आम्ही ‘महनीय’ (व्हीआयपी) प्रमाणे उपचार करण्याची सिद्धता दर्शवली. त्यानुसार प्रतिदिन ८ सहस्र रुपये (ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांच्याखेरीज) अधिक औषधांचा व्यय वेगळा होता.

रुग्णालयाने दोन्ही रुग्णांसाठी ६ ऐवजी ७ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोर्स सांगणे, ओळखीच्या आधुनिक वैद्यांनी रुग्णालयाला खडसावल्यावर जास्तीचे इंजेक्शन रहित केले जाणे

तेथे दोन्ही रुग्णांसाठी ६ ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचा कोर्स सांगण्यात आला. आमच्या ओळखीच्या आधुनिक वैद्यांच्या निगराणीमध्ये सर्व व्यवस्थित चालू होते आणि त्यांनी अगोदरच आम्हाला ६ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोर्स सांगितला होता; पण रुग्णालयाने ‘रेमडेसिविरचे ७ वे इंजेक्शन घ्यावेच लागेल’, असे सांगितले. ते इंजेक्शन घेतल्याखेरीज ते ‘डिस्चार्ज’ देत नव्हते. याविषयी आम्ही लगेच आमच्या ओळखीच्या आधुनिक वैद्यांना कळवले. त्या वेळी त्यांनी रुग्णालयाशी संपर्क करून सांगितले की, ‘माझ्या रुग्णाला उच्च रक्तदाब आहे. त्यामुळे त्यांना रेमडेसिविरचे ६ हून अधिक डोस सहन होणार नाहीत आणि तशी आवश्यकताही नाही. माझ्या रुग्णाला काही झाले, तर मी तुमच्यावर कारवाई करीन’, असे खडसावले. त्यानंतर दोन्ही रुग्ण बरे होऊन त्यांना ३ दिवसांनी ‘डिस्चार्ज’ मिळाला.

रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन बाजारमूल्यापेक्षा अधिक दराने विक्री करणे आणि रुग्णासाठीच्या जेवणाचा व्यय सरकारकडून न आल्याने रुग्णालयाने तो त्याच्या देयकाला जोडणे

रेमडेसिविर हे इंजेक्शन रुग्णालय १ सहस्र ५०० रुपये दराने देत होते. ते इंजेक्शन बाहेर ९०० रुपये दराने मिळत होते. आम्ही जोपर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन घेत होतो, तोपर्यंत आमच्या रुग्णाला उच्च प्रतीची २ वेळची न्याहारी आणि जेवण मिळत होते. रुग्णांनी रेमडेसिविर इंजेक्शन घेणे बंद केले. तेव्हा रुग्णालयाने आमच्याकडून पुढील ३ दिवसांचे जेवण आणि न्याहरीचे देयक जोडले होते. याविषयी आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘तुम्हाला अगोदर जे मिळाले, ते सरकारकडून होते. आम्हाला जेवणाचा खर्च सरकारकडून आलाच नाही. बाहेरून विकत घेऊन आणले आहे. त्याचे हे देयक आहे.’

‘व्हीआयपी’ आणि सामान्य वॉर्ड येथील रुग्णांवर केल्या जाणार्‍या उपचार पद्धतीविषयीचा भेद

याचसमवेत आमच्या लक्षात आले की, आमचा रुग्ण ‘व्हीआयपी’ वॉर्डमधील असल्यामुळे आमच्या रुग्णाभोवती २४ घंटे आधुनिक वैद्य आणि कर्मचारी असायचे. त्यामुळे तेथे एकही रुग्ण दगावला नाही. याउलट सामान्य वॉर्डमधील परिस्थिती गंभीर होती. तेथे प्रतिदिन ५ ते ६ रुग्ण मृत्यूमुखी पडत होते. आर्थिक स्थिती पाहून रुग्णांवर कशा प्रकारे उपचार करण्यात येत होते, ते बघायला मिळाले.

– एक साधक

ओळखीच्या आधुनिक वैद्यांचा लक्षात आलेला सेवाभाव

या वेळी आपल्या पाठीशी एक चांगले आधुनिक वैद्य असणे किती आवश्यक आहे ? हे लक्षात आले. आमच्या ओळखीचे आधुनिक वैद्य हे सेवाभाव ठेवून त्यांचा व्यवसाय करत होते. प्रतिदिन ४०० ते ५०० रुग्ण तपासल्यावरही ते आमच्या रुग्णांचा प्रतिदिन रात्री ११ वाजता आढावा घेत होते. (असे प्रत्येक आधुनिक वैद्यांनी केले, तर आधुनिक वैद्यांवरचा विश्‍वास नक्कीच वाढेल ! – संपादक) प्रमुख डॉक्टरांशी बोलून त्यांनी आमच्या रुग्णांच्या ‘डिस्चार्ज’ची सिद्धता अगोदरच करून ठेवली होती. (असे किती आधुनिक वैद्य रुग्णाची काळजी घेतात ? – संपादक)

‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
ई-मेल पत्ता : [email protected]