गोवा राज्यात गेल्या ४ वर्षांत ७१ सरकारी प्राथमिक शाळा बंद

पणजी, २३ मे (वार्ता.)-  गेल्या ४ वर्षांत गोवा राज्यातील एकूण ७१ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. त्यात ७० मराठी माध्यमातील आणि एक शाळा कोकणी माध्यमातील आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये १२ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. विद्यार्थी पटसंख्या अल्प आहे, हे या शाळा बंद करण्यामागचे कारण आहे, असे शिक्षण खात्याकडून सांगितले जात आहे; मात्र सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या का घटली ? हे शोधण्याचा प्रयत्न शासन किंवा शिक्षण खात्याकडून होत असलेला दिसत नाही, तसेच सरकारी शाळांत विद्यार्थी वाढावेत, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होतांना दिसत नाहीत. एका बाजूने सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला, तर दुसरीकडे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाकडून ४ नवीन खासगी शाळांना अनुमती देण्यात आली आहे.

यामध्ये कुर्टी, फोंडा येथे कोकणी माध्यमाची प्राथमिक शाळा, वाळपई, सत्तरी आणि सांखळी येथे मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा, तसेच तिसवाडी तालुक्यात एका सीबीएस्सी अभ्यासक्रमाच्या खासगी शाळेला अनुमती देण्यात आली आहे. शिक्षण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ४ वर्षांमध्ये ७१ शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत ३२, २०१८-१९ या वर्षांत १५, २०१९-२० या वर्षांत १२, तर २०२०-२१ या वर्षांत १२ शाळा बंद झाल्या आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये चालू होणार असून शाळांतील विद्यार्थी नोंदणीनंतरच शाळांविषयी शासन निर्णय घेणार आहे. बंद झालेल्या शाळांतील शिक्षकांना ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, त्या शाळांमध्ये सामावून घेण्यात येत असल्याचे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले.