तौक्ते चक्रीवादळामुळे बुडालेले जहाज समुद्राच्या तळाशी सापडले !

जहाजाचे कप्तान अद्याप सापडलेले नाहीत

मुंबई – नौदलाच्या शोध मोहिमेनंतर ‘मुंबई हाय’ येथे समुद्रात बुडालेले ‘पी ३०५’ हे जहाज येथील हिरा तेल विहिरीजवळ समुद्रात ३० मीटर खोलीवर सापडले आहे. चक्रीवादळाची सूचना देऊन जहाज बंदरावर न आणल्याच्या आरोपावरून जहाजाचे कप्तान राकेश बल्लव यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वत: राकेश बल्लव अद्याप सापडलेले नाहीत.

१. ‘आय.एन्.एस्. मकर’ या ‘कॅटामरीन’ श्रेणीतील नौकेने २२ मे या दिवशी विशेष ‘सोनार रडार’च्या साहाय्याने या जहाजाचा शोध लावल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली.

२. ‘पी ३०५’ या जहाजावर २६१ कर्मचारी होते. त्यातील १८६ जणांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दल यांना यश आले; मात्र ६६ जणांचा मृत्यू झाला. अद्यापही ९ जणांचा शोध लागलेला नाही.

३. या दुर्घटनेत मृत झालेल्या कर्मचार्‍यांची नोंद ‘अपघाती मृत्यू’ अशी करण्यात आली आहे.