एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी. कायम तिच्या राष्ट्रद्वेषी, भाषाद्वेषी अथवा संस्कृतीद्वेषी कृतींमुळे चर्चेत असते. आता इयत्ता ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एका धड्यात हिंदूंच्या देवतेच्या नावाचा वापर नकारात्मकता पसरवण्यासाठी केला आहे. ‘हरि’ नावाचा मुलगा मुलींची छेड काढतो, त्यांच्या वेण्या खेचतो, त्यांच्यावर दादागिरीही करतो. परिणामी मुले त्याला घाबरतात, तर इयत्ता ४ थीच्या धड्यात अब्दुल नावाचा मुलगा अपंग मुलीला शाळेत नेण्यासाठी साहाय्य करतो, वडिलांना साहाय्य करतो असे दाखवून त्याची चांगली प्रतिमा रंगवली आहे. वाईट वृत्तीच्या मुलाचे नाव ‘हरि’ आणि चांगल्या वृत्तीच्या मुलाचे नाव ‘अब्दुल’ असे लिहून हिंदु समाजाची अपकीर्ती आणि मुसलमानांचे उदात्तीकरण करण्याचा हा डाव आहे. एन्.सी.ई.आर्.टी. गेली कित्येक वर्षे हिंदु धर्मावर विविध पद्धतीने आघात करत आहे; मात्र तिला अजूनही रोखता न येणे, हे संतापजनक होय !

अक्षम्य चुका !

याच वेळी एन्.सी.ई.आर्.टी.च्या ‘राष्ट्रीय शिक्षा नीती २००५’च्या अनुसार स्थानिक भाषांची शब्दावली मुलांपर्यंत पोचवण्याच्या नावाखाली ‘छह साल की छोकरी, भरकर लाई टोकरी ।’ ही कविता पाठ्यपुस्तकात घेतली आहे. हिंदी भाषिक व्यक्तींच्या मते ही सर्वांत ‘घटिया’ कविता आहे. लहान मुलींना ‘छोकरी’ असे ना बिहार, ना उत्तरप्रदेश येथे म्हटले जाते. या कवितेविरुद्ध सामाजिक माध्यमांमध्ये राष्ट्रप्रेमींनी जोरदार आवाज उठवला आहे. ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या प्रकाशन गटाचे प्रमुख महंमद सिराज अहमद आहेत, त्यामुळे असे होत आहे’, असे सांगितले जाते. आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे ‘औरंगजेब आणि शहाजहान यांनी मंदिरे बांधली’ असे पाठ्यपुस्तकात शिकवले जातेे. माहिती अधिकारात ही गोष्ट उजेडात आली. या उदाहरणांवरून राष्ट्रीय शिक्षण संस्थेत नेमके काय चालू आहे किंवा ती ‘चालू’ संस्था आहे का ? अशी चर्चा आहे.

शैक्षणिक संस्थांनी सिद्ध केलेल्या अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तके सिद्ध होतात. ही क्रमिक पुस्तके अभ्यासून विद्यार्थी घडतात. त्यांच्या मनावर लहान वयातच जे संस्कार होणार त्यानुसार त्यांची दृष्टी, विचार करण्याची पद्धत आणि वृत्ती ठरते. श्रीविष्णूचे नाव असलेल्या ‘हरि’च्या नावाविषयी चुकीच्या गोष्टी जोडून त्याच्याविषयी घृणा निर्माण करण्याचाच आणि एका विशिष्ट अल्पसंख्य समाजाविषयी ममत्व वाढवण्याचा एन्.सी.ई.आर्.टी.चा हा प्रयत्न आहे, हे लपून रहात नाही. एन्.सी.ई.आर्.टी. ही आतापर्यंत साम्यवाद्यांच्या हातचे बाहुले बनून राहिली होती. परिणामी भारतीय मुले भारताच्या दैदिप्यमान इतिहासापासून वंचित राहिली, तर मोगलांविषयी, धर्मांधांविषयी आत्मीयता बाळगणारी झाली. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अटकेपार झेंडे फडकावणारे पेशवे यांचा अत्यंत त्रोटक उल्लेख आहे. जणू त्यांचा काही या पुस्तकांशी संबंधच नाही अशा प्रकारे त्यांची मांडणी केली आहे. मुलांचे राष्ट्राभिमानी आदर्शच पालटले, तर मुले कधी चांगले नागरिक बनू शकतील का ?

राष्ट्रद्वेषी पिढी निपजणे !

मुलांना सत्य माहिती न देता त्यांचा बुद्धीभेद करणारी माहिती पाठ्यपुस्तकांत दिल्यास काय होते, त्याचे जे.एन्.यू. विद्यापीठ मोठे उदाहरण आहे. तेथे शिकणारी मुले भारतीयच आहे, तरी बहुतांश मुले भाषा बोलतात पाकच्या तोंडची ! पाकचा जयजयकार करणे, भारतीय सैनिक आणि भारत यांच्या निषेधाच्या घोषणा देणे हे येथे अधिक प्रमाणात चालते. भारतियांचे लाखो रुपये प्रत्येक विद्यार्थ्यावर व्यय होत असतांना ते शत्रूची भाषा बोलू शकतात, याचे कारण म्हणजे त्यांना मिळणारे राष्ट्रविरोधी, हिंदुविरोधी शिक्षण ! त्यामुळे त्यांना अफझलसारखे आतंकवादी ‘प्यारे’ वाटू लागतात आणि भारताचे सैन्य अथवा पोलीस ‘कातील’ वाटू लागतात. अशा पिढीचे राष्ट्राच्या उत्कर्षात योगदान दूरच, ती बाधाच असणार आहे.

हिंदुद्वेष भिनवणे !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकात दोन वेगवेगळ्या मित्रांमध्ये झालेला संवाद मांडला आहे. ‘रामायणाला आपण सर्वोत्तम ग्रंथ मानतो; मात्र का ते समजत नाही ? संत तुलसीदासने स्त्रीजातीची किती निर्भत्सना केली आहे ? वाली वधाचे कसे समर्थन केले आहे ? सीतेवर घोर अन्याय करणार्‍या रामाला अवतार म्हटले आहे. या ग्रंथात कोणते सौंदर्य आहे ?’ हा संवाद अत्यंत चुकीचा आहे आणि श्रीरामाचा अवमान करणारा आहे. रामायण आणि महाभारत भारताचा गौरव आहे, कोट्यवधी भारतियांची त्यांवर श्रद्धा आहे. ज्याला सौंदर्य म्हणजे काय हे ठाऊक नाही, त्याला रामायणातील सुंदरता कधी कळेल का ? बुद्धीभेद करणारे वरील प्रश्‍न वाचल्यावर या पाठ्यपुस्तकांच्या आड जाणीवपूर्वक हिंदूंच्या श्रद्धाभंजनाचा प्रयत्न होत आहे, असे लक्षात येते. मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या ग्रंथांविषयी असे मांडण्याचे लेखकाचे धाडस झाले असते का ? त्यांना त्याचे परिणाम ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी विकृत माहिती पसरवणे दूरच त्यांच्या नावांविषयीही संवेदनशीलता दाखवली जाते.

पाठ्यपुस्तके कोणत्याही लेखकाने लिहिली, तरी ती पडताळण्यासाठी तज्ञांची समिती नसते का ? तज्ञांच्या समितीतूनही अशा गंभीर (नव्हे जाणूनबुजून) केलेल्या चुका कशा सुटतात ? म्हणून पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेवर करडी दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक घटकावरच लक्ष ठेवून त्यातून विद्यार्थी, समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे अहित होत नाही ना ? हे पहाणे काळाची आवश्यकता आहे. गोव्याच्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या क्रमिक पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत त्रोटक माहिती दिल्यावर हिंदु जनजागृती समितीने राज्यव्यापी आंदोलन उभे केले, जनजागृती केली, तेव्हा सरकार झुकले आणि छत्रपतींचा इतिहास ५ ओळींवरून ५ पानांमध्ये दिला गेला. एन्.सी.ई.आर्.टी.ला जी भाषा समजते, त्याच भाषेत समजावणे अपेक्षित असेल, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी ते निश्‍चितच करतील ! मात्र एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत. सरकारने ते करून राष्ट्र आणि धर्म भावनांचे भंजन रोखावे, ही भारतियांची मागणी आहे.