
‘कॉकरोच जनता पार्टी’ने तिचे नवी देहलीतील जंतरमंतर येथे पहिले आंदोलन घेतले. ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) विद्यार्थ्यांचा मुख्य सहभाग असलेल्या या पक्षाकडे देशविरोधी शक्ती आणि विरोधी पक्ष हे अत्यंत आशाळभूत दृष्टीने पहात होते. जणू देशविरोधी काम करण्यासाठी एक आशेचा किरण त्यांना यांच्या रूपात दिसत आहे कि काय, एवढा आनंद झाला आहे. जे सोनम वांगचुक ‘उद्या चीनचे सैन्य लडाखमध्ये आले, तर त्यांना आम्ही भारतात शिरण्याचा मार्ग दाखवू’, असे म्हणतात; जे स्वत: लडाखमध्ये भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत, ते मोठ्या उत्साहाने या आंदोलनाचे नेते म्हणून आंदोलनस्थळी आले होते. साम्यवादी आघाडीच्या नेत्या ॲनी राजा, हिंदुविरोधी अभिनेते प्रकाश राज यांच्यासह काही राजकीय संघटनांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणजे मूलत: ‘जेन झी’ वयोगट आणि सध्याचे तरुण यांचा सहभाग अपेक्षित असलेल्या या आंदोलनात राजकीय विचारसरणी असलेल्या नेत्यांच्या उपस्थितीवरून आंदोलनाचे राजकीयीकरण झाल्याचे लक्षात येते. याचाच अर्थ हे एकप्रकारचे राजकीय आंदोलनच होते.
विद्यार्थी कि राजकीय आंदोलन ?
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या स्थापनेपासून या पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या पानांना लाखो अनुयायी (फॉलोअर्स) मिळाले. त्यांच्या व्हिडिओंजना कोट्यवधी ‘व्ह्यूज’ (पाहिले गेले) मिळाले, ज्यामुळे अतिशय वेगाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चा ‘जेन झी’मध्ये प्रसार झाला. सामाजिक माध्यमांवरील वाढत्या प्रतिसादामुळे ‘आता कृतीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे, यातून जनमत मोठ्या प्रमाणात एकत्र करता येईल’, या हेतूने या पक्षाने हे पहिले आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनाचे मुख्य सूत्र हे ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लवकर त्यागपत्र दिले पाहिजे’, हे होते. नैतिकदृष्ट्या ही मागणी न्याय्य आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तसे केलेही पाहिजे होते, असे राष्ट्रप्रेमींनाही वाटते. यातील मूळ सूत्र रहाते ते, म्हणजे एवढ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सरकारच्या अनेक विभागांचा सहभाग आहे; अनेक अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्तरावर अन्य यंत्रणा इत्यादींचा समावेश आहे, त्यांच्या चौकशीची मागणी झाली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देऊन मोकळे होतील; मात्र प्रशासकीय स्तरावरची भ्रष्ट यंत्रणा दुरुस्त कोण करणार ? त्यासाठी कुणी काही करायला नको का ? ज्या लातूर येथे या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे, समाजात वलयांकित व्यक्तीमत्त्वे असलेले आरोपी म्हणून सापडले, तेथील कुणाच्या राजकीय पाठिंब्याने मोठे प्रकरण झाले, याचाही शोध घेतला पाहिजे. अशा विविध मागण्या या आंदोलनात दिसल्या नाहीत. आंदोलनकर्त्यांना मुळात विषय सोडवण्याची इच्छाशक्ती आहे का ? हा प्रश्न आहे.
आंदोलनात समन्वयाचा अभाव ?
काही गोष्टींचा क्रम जोडल्यास हे विद्यार्थी आंदोलन वाटले, तरी यामध्ये ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा आहे का ? याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लपलेले हेतू काय आहेत ? हेसुद्धा पडताळले पाहिजे. जे सध्या ‘कॉकरोच’चे नेते म्हणून आंदोलनात सहभागी आहेत, त्यांची स्थिती काय होती ? मुख्य समन्वयक अभिजित दीपके थेट अमेरिकेतून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले. ते येथील पोलीस ठाण्यात जाऊन रितसर अनुमती घेऊन आंदोलनस्थळी जाणार होते; मात्र ते थेट आंदोलनस्थळी गेल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात गदारोळ झाला. दुसरा एक समन्वयक विद्यार्थी आंदोलन करत असतांना दीपके मात्र झाडाखाली बसून चहा-कॉफी प्यायला बसले आहेत. याखेरीज त्यांना हवा घालण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केल्याचे जनतेने पाहिले. सामाजिक माध्यमांवर हा पक्ष म्हणून अनेक प्रकारे व्यक्त होता येत असले, तरी प्रत्यक्ष मैदानात आंदोलनाच्या ठिकाणी जी शिस्तबद्धता लागते, ती या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्यात दिसली नाही. काही विरोधी गट आंदोलनात शिरल्यामुळे त्यांनाही या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरता न आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. एकूणच काय, तर राजकीय रणनीती आखण्याचा पूर्वानुभव नसल्यामुळे आंदोलन परिणामकारक झाले नाही. उलट अनेक राजकीय पक्षांनी नंतर या आंदोलनाला पाठिंबा घोषित केल्यामुळे त्यांचेच हसे होईल, अशी परिस्थिती झाली. एकूणच काहीतरी मोठे करण्याच्या वा व्यवस्थेला आव्हान देण्याच्या नादात किंवा नेपाळसारखा पालट विद्यार्थी उठाव या पक्षाच्या माध्यमातून भारतातही करतील, असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासमोर बिकट स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थी भलेही संघटित झाले; पण कशाला तरी विरोध म्हणून निर्माण झालेली ही वावटळ फार काळ टिकेल, असे वाटत नाही, असाही सूर तज्ञांचा होता.
राष्ट्रप्रेमींच्या ‘हिट’ची आवश्यकता !
हा पक्ष विद्यार्थी शक्ती एकत्रित करण्याच्या नावाखाली देशविरोधी चळवळींचे बाहुले बनू शकतो आणि त्या माध्यमातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष देशविरोधी कारवाया होऊ शकतात. नुकतेच भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे लंडन येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्यावर तेथे प्रश्न विचारतांना ‘कॉकरोच’च्या सूत्रावरून त्यांचा अपमान करण्यात आला, म्हणजे देशाच्या सरन्यायाधिशांनी वेगळ्या संदर्भात दिलेल्या उदाहरणाचा विपर्यास करून त्या विरोधात आता एका पक्षाचा जन्म होणे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन होणे, हे सगळे काही पूर्वनियोजित असल्याचे वाटते. ‘परा’चा कावळा करणे’, अशी म्हण प्रचलित आहे. त्याचेच ही घटना उदाहरण आहे. जगामध्ये भारतात सर्वांत अधिक संख्येने तरुणवर्ग आहे, म्हणजेच भारत तरुणांचा देश आहे. या तरुणांना दिशा देण्यासाठी, तिला कृतीप्रवण करण्यासाठी, त्यांच्यासाठी कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहेच. या तरुणांचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करून घेण्यास मात्र देशातील काही गट सक्रीय आहेत. भारतात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे, तरी त्याचा अतिरेक करू नये. साम्यवादी चळवळीतील शरजील इमाम, उमर खालिद, कन्हैया कुमार अशा विद्यार्थी नेत्यांनी तरुणांची माथी भडकवली होती. पुन्हा अशी शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रप्रेमींनी संघटित राहून त्या त्या भागातील तरुणांना दिशा देणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमींच्या एकजुटीची ही ‘हिट’ ‘कॉकरोच’ला पळता भुई थोडी करू शकते, यात शंकाच नाही !


संपादकीय : हिंदू जात्यात !
संपादकीय : हरवलेले समाधान !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !