नागपूर येथे ३ लाख रुपयांची लाच घेणार्‍या दोघांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महापालिका प्रशासन !

नागपूर – येथे ८० लाख रुपयांचा कर माफ करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सूरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे त्यांची नावे असून ते येथील महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत. सूरज गणवीर हा कर संग्रहक आहे, तर रवींद्र बागडे सायबर टेक आस्थापनात निरीक्षक म्हणून कामाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांच्या घराची झडती घेतली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार रामचंद्र जेठानी यांच्या मालकीचे ‘रिसॉर्ट’ आणि ‘लॉन’ आहे. वरील दोन्ही आरोपींनी संगनमत करून जेठानी यांना ८० लाख रुपयांचा कर थकित असल्याचे कारण देत नोटीस बजावली होती. ‘कर माफ करायचा असेल, तर ६ लाख रुपयांची लाच द्यावी लागेल’, असा प्रस्ताव आरोपींनी जेठानी यांना पाठवला होता. ‘कोरोना महामारीमुळे दीड वर्षापासून ‘लॉन’चा व्यवसाय ठप्प पडला असल्याने ६ लाख देणे शक्य नाही’, असे जेठानी यांनी सांगितले, तेव्हा ३ लाख रुपयांमध्ये हा व्यवहार अंतिम झाला.