नागपूर – शहरातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट चालूच आहे. सरकारचा आदेश झुगारून बहुतांश खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ स्वरूपात पैशाची वसुली करतात. शहरातील ‘आयुष्यमान’ नामक रुग्णालयाने एका रुग्णाकडून आगाऊ रक्कम म्हणून चक्क ३ लाख रुपये वसूल केले. या संदर्भात रुग्णालयाने दिलेली आगाऊ रकमेच्या वसुलीची पावती दाखवत माजी महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे याविषयी तक्रार करून संबंधित खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित रुग्णांनी आमच्याशी संपर्क साधून देयके पडताळून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (जी गोष्ट संदीप जोशी यांना समजते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला का समजत नाही ? – संपादक)
याविषयी संदीप जोशी पुढे म्हणाले की, कायद्याच्या कचाट्यात अडकू नये आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये; म्हणून रुग्णालय व्यवस्थापनाकडून साध्या पेपरवर रुग्णालयाचा शिक्का मारून रुग्णांकडून आगाऊ रक्कम वसुली केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने लेखापरीक्षक नियुक्त केले आहेत; पण ते रुग्णालयाशी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरातील एकेका घरातील ३-३ व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती होत आहेत आणि केवळ ‘डिपॉझिट’साठी लाखो रुपये मागितले जात आहेत. ‘डिपॉझिट’ न दिल्यास शहरातील अनेक रुग्णालये मृत्यू पावत असलेल्या रुग्णांची भरतीही करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. काही आधुनिक वैद्य निश्चितच चांगले काम करत असतांना काही आधुनिक वैद्य आणि रुग्णालये दुर्दैवाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत.