देहली येथून ‘रेमडेसिविर’ आणल्याचे सांगण्याचा दिखाऊपणा टाळायला पाहिजे होता !

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने खासदार सुजय विखे पाटील यांना फटकारले

सुजय विखे पाटील

मुंबई – तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. विमानातून उतरल्यानंतर ‘रेमडेसिविर इंजेक्शन्स’ उतरवतांना व्हिडिओ काढण्याचे नाटक टाळता आले असते. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशा प्रकारे स्वत:ची ओळख वापरून देहली येथून रेमडेसिविर आणले, हे सांगण्याचा दिखाऊपणा टाळायला पाहिजे होता, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना फटकारले. त्यांनी मतदारसंघात १० सहस्र ‘रेमडेसिविर’चे अवैधरित्या वाटप केल्याप्रकरणी राहुरी येथील अरुण कडू आणि अन्य ३ जणांनी विखे पाटील यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती भालचंद्र देबदार यांच्या खंडपिठापुढे ३ मे या दिवशी या याचिकेवर सुनावणी झाली.

खासदार विखे पाटील यांच्या वतीने भाजपचे खासदार शिरीष गुप्ते यांनी सुजय विखे पाटील यांच्या बाजूने न्यायालयात मांडली. सुजय विखे पाटील यांनी ‘रेमडेसिविर’चे इंजेक्शन अवैधरित्या खरेदी करून त्यांचे वाटप केल्याचा आरोप त्यांनी नाकारला.

सुजय विखे पाटील यांच्या ‘चार्टर्ड’ विमानात १५ खोके होते. त्यामध्ये १ सहस्र २०० इंजेक्शन्स आणल्याचे गुप्ते यांनी न्यायालयात सांगितले. ‘इंजेक्शन’च्या संख्येविषयी सामाजिक माध्यमावर माहिती दिली नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. खासदार विखे पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतल्याविना कोणताही आदेश देता येणार नाही, अशा शब्दांत गुप्ते यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे या दिवशी होणार आहे.