श्री तुळजाभवानीदेवीची धन्वंतरी रूपात विशेष पूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची धन्वंतरी रूपात विशेष पूजा

तुळजापूर – कोरोनाच्या संकटातून सर्वांचे रक्षण होण्यासाठी श्री तुळजाभवानीदेवीची धन्वन्तरी  रूपात विशेष पूजा बांधण्यात आली. यात श्री तुळजाभवानीदेवीच्या नित्य पूजेनंतर मस्तकी मळवट भरून आधुनिक वैद्यांचे चिन्ह असणारा ‘लोगो’ हळदी-कुंकवात काढण्यात आला होता.

कोरोनाचे जगावर आलेले संकट दूर होण्यासाठी प्रतिदिन श्री तुळजाभवानीचा मळवट भरून त्यावर कुंकवाने स्वस्तिक, कमळ, त्रिशूळ, सूर्य, मोर, ओम अशा प्रकारच्या धार्मिक चिन्हासह आकर्षक चिन्ह महंत आणि पुजारी प्रतिदिन काढतात. ३ मे या दिवशी या देवीच्या मस्तकी आधुनिक वैद्यांचा ‘लोगो’ काढण्यात आला होता. (श्री तुळजाभवानी देवीच्या मस्तकी मळवटामध्ये धार्मिक चिन्हे काढल्याने त्यातून शक्ती प्रक्षेपित होते आणि त्याचा दर्शन घेणार्‍या भक्तांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. आधुनिक वैद्यांचे चित्र काढल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार नाही. भक्तांनी मनोभावे केलेली प्रार्थना देवतांपर्यंत पोचतेच. त्यामुळे कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना करण्यावर भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक कृतीचे आध्यात्मिक कारण समजण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकताच आहे. – संपादक)