तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण सांगता येणार नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासकीय अधिकार्यांना आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे अनुमान तज्ञांनी वर्तवले आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूविषयी स्वयंपूर्ण झाले पाहिजे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही, याची दक्षता घ्या, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्तांना दिला.


२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प उभारला गेला पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ चालू आहे, ती तेव्हा होता कामा नये.’’

२०-२५ लाख लसी मिळाल्याविना १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लसीकरणाला प्रारंभ नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

लसीकरणासाठी शासन प्रयत्नशील असले, तरी लसी मिळवणे आव्हानात्मक झाले आहे. २०-२५ लाख लसी मिळाल्याविना १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांना लसीकरण चालू करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लस खरेदीचे कार्यादेश दिले जातील.