महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने…
संकलक : श्री. अजय केळकर, कोल्हापूर
१ मे या दिवशी अवघा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा करत आहे. जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासाठी, अटकेपार झेंडे फडकवणार् या पेशव्यांच्या पराक्रमासाठी, संत ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम-एकनाथ महाराज यांच्यासह शेकडो संतांच्या वचनांसाठी, शक्तीपिठांसाठी, सत्संगासाठी परिचित आहे, तोच महाराष्ट्र आज कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी झुंजत आहे. महाराष्ट्रात शासकीय आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालये बर्यापैकी सक्षम आहेत. औषधे, वैद्यकीय उपकरणे मिळत नाहीत, असेही नाही. असे असतांना देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत असून ऑक्सिजनअभावी रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोनाच्या सद्यःस्थितीवर केवळ बौद्धिक पातळीवर उपाययोजना काढल्या जात असून कुणीही धर्म-अध्यात्म यांच्या स्तरावर काय करायला हवे, याचा विचार करत नाही. तोच विचार प्राधान्याने करण्याची आज अत्यावश्यकता आहे.
ऑक्सिजन-रेमडेसिविरच्या तुटवड्याने जिल्ह्या-जिल्ह्यांत दुरावा
जेव्हा कुठलीही अडचणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा साहजिकच राज्याचा एक कुटुंब म्हणून विचार करता एका जिल्ह्याने दुसर्या जिल्ह्याला साहाय्य करणे आवश्यक आहे. इथे स्थिती उलट दिसत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे सोलापूर-पुणे आणि कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकारी यांच्यात ऑक्सिजनचा टँकर कुणी वापरायचा, यावरून वाद झाला. ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ एका जिल्ह्याने दुसर्या जिल्ह्याला द्यायचे नाही, असे आदेश काढावे लागले.
नागरिकांमध्ये संयमासह अनेक गुणांचा अभाव !
महाराष्ट्राची लोकसंख्या पहाता इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना इतक्या अल्प कालावधीत लस देणे शक्य नाही. त्यामुळे काही प्रमाणात लसचा तुटवडा होणे, पुरेसा पुरवठा न होणे या गोष्टी साहजिकच होणार; मात्र दुसरीकडे लस मिळत नाही म्हणून नागरिकांमध्ये कुठलाच संयम दिसून येत नाही. अनेक ठिकाणी लस आल्यावर नागरिकांची झुंबड उडाली आणि कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. जो ईश् वराचा भक्त असतो, त्याच्याकडे संयम हा असतोच. त्याच्यात अनेक गुणांचा समुच्चय असतो. येथे साधना नसल्याने लस अथवा अन्य कुठलेही औषध मला मिळावे, अशीच सध्या नागरिकांची स्थिती आहे आणि यातून संघर्षाची स्थिती उद्भवते !
राजकीय चिखलफेकीमुळे एकमेकांना साहाय्याऐवजी नागरिकांची विभागणी होणे
आजच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकसंघपणे काम करण्याची आवश्यकता आहे. असे असतांना राजकीय चिखलफेकीमुळे लोक एकमेकांना साहाय्य करण्याऐवजी गटागटांत विभागले जातांना दिसत आहेत. यामुळे लोकांमधील दरी वाढत असून राज्य आणि राष्ट्र म्हणून कुणी विचार करतांना दिसत नाही.
धर्मशिक्षण देणे आणि समाजात साधना रुजवणे, हेच प्रत्येक समस्येवर उत्तर !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात संकटे आली नाही असे नव्हते, तसेच प्रत्येक काळात या ना त्या स्वरूपात संकटे होती; मात्र त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: साधना करायचे, तसेच प्रजाही धर्मपालन करत होती. येथे साधनेचे पाठबळ असल्याने अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी भगवंताचे साहाय्य मिळत असे. त्यामुळे कुणी भरडले जात नसे, तसेच कुणावर अन्याय होत नसे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सर्वच जण साधना आणि अध्यात्म यांपासून दूर गेल्याने ईश्वराची कृपा झाली नाही आणि केवळ बुद्धीच्या स्तरावर मनुष्य उत्तरे शोधू लागला. ही बुद्धी सात्त्विक आणि त्यात समर्पित भाव नसल्याने त्याला मर्यादा येऊ लागल्या.
कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यावर दुसरी लाट इतकी वेगाने कशी आली आणि त्यावर नेमकी उपाययोजना काय, याविषयी कुणीच काही निश्चित सांगू शकत नाही. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हेही अचंबित आहेत. ‘अधर्म हेच सर्व रोगाचे मूळ’ या मूळ सिद्धांतांवर कुणी विचार करण्यास सिद्ध नाही. यातून बाहेर पडण्यासाठी परत एकदा महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त झाली, धर्म नाश पावत आहे आणि हे सांभाळणारा कुणी नाही. हे राष्ट्रीय कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी करावे, म्हणून त्यांना उद्देशून ‘महाराष्ट्र धर्म तुमची वाट पहातोय’, असे समर्थ रामदासस्वामी म्हणाले. महाराष्ट्र धर्म म्हणजे लोकांमधील राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणे होय ! महाराष्ट्र धर्म म्हणजेच व्यापक अर्थाने राष्ट्रभक्ती ! त्यामुळे परत एकदा महाराष्ट्र धर्म जागवण्याची वेळ आली आहे.
श्री. अजय केळकर