|
असा उपक्रम राबवल्याविषयी ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’ आणि बजरंग दल यांचे अभिनंदन !
अमरावती – शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’च्या संचालकांनी सामाजिक भान राखत विनामूल्य आणि आवश्यकता भासलीच, तर प्रिस्क्रिप्शन पाहून घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळावा आणि त्यांचे प्राण वाचावेत, म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’चे संचालक हिमांशू वेद यांनी सांगितले. ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’ने घेतलेल्या या निर्णयाला बजरंग दलाने साहाय्य करून ‘प्लँट’पासून गरजवंताच्या घरापर्यंत विनामूल्य सिलिंडर पोचवून देण्यासाठी सिद्धता दर्शवली आहे.
‘श्रीवल्लभ प्लँट’ यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही; मात्र सिलिंडर घेऊन जातांना सिलिंडरची अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून ३ सहस्र ५०० रुपये भरावे लागतील. ही रक्कम सिलिंडर परत केल्यानंतर परत केली जाणार आहे. शहरात मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयांना, तसेच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’कडून केले जात आहे. ‘श्रीवल्लभ’चा ऑक्सिजन प्लँट बडनेरा जुना बायपास मार्गावरील औद्योगिक वसाहतीमध्ये आहे.
घरापर्यंत विनामूल्य सेवा देऊ !
गरजूंनी आम्हाला किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला दूरभाषद्वारे माहिती द्यावी. कोणतेही शुल्क न आकारता आम्ही घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देणार आहोत. ही सुविधा २७ एप्रिलपासून चालू केलेली आहे. – संतोषसिंह उपाख्य बाबूभैय्या गहरवार, संयोजक, बजरंग दल, अमरावती.