महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १५ मेपर्यंत वाढ

मुंबई – राज्यात ३० एप्रिलपर्यंत असलेली दळणवळण बंदी १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. २८ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील ३ दिवसांत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न्यून होत आहे. दळणवळण बंदीचा हा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन दळणवळण बंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध यापुढेही कायम रहाणार आहेत.

१८ ते ४४ वयोगटांतील सर्व नागरिकांचे विनामूल्य लसीकरण करणार ! – मुख्यमंत्री

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटांतील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २८ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

याविषयी अधिक माहिती देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मागील वर्षापासून आपण कोरोनाविरोधात लढत आहोत. जानेवारीपासून केंद्रशासनाच्या सहकार्याने राज्यात लसीकरण चालू आहे. आजतागायत ४५ वर्षांच्या पुढील वयोगटांतील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशातील विक्रम आहे. सध्या ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ या आस्थापनांच्या लसी उपलब्ध आहेत. त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने अधिकाधिक लस उपलब्ध करून देण्यात येतील. १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांनी लसीकरणासाठी भ्रमणभाषद्वारे ‘कोविन अ‍ॅप’ वर नोंदणी करावी. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.’’

लसींच्या अभावामुळे महाराष्ट्रात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण होणार नाही ! – आरोग्यमंत्री

कोरोनावरील लसींचा पुरवठा होण्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे राज्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून चालू होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शासनाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत आहे, असेही त्यांनी सांगितले. टोपे पुढे म्हणाले, ‘‘आपल्याला लसींचे डोस त्वरित उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत हे डोस उपलब्ध होणार असतील, तर अचानक एकाच वेळी ते देता येणार नाहीत. त्यामुळे आता समजुतदारपणे काम करावे लागेल. नोंदणीसाठी ‘कोविन अ‍ॅप’ वापरणे सक्तीचे आहे. केंद्रशासनाने नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे आधी नोंदणी करून मगच लसीकरण केंद्रावर जावे लागेल. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. ५ कोटी ७१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. वरिष्ठ मंत्र्यांची एक समिती याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ वर्षे वयोगट, अशा वर्गवारीवर काम चालू आहे. ३५ ते ४४ वर्षे हा गट आधी घेता येईल का ? याची चाचपणी चालू आहे. यांतील सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का ? यावर विचार चालू आहे. १८ ते ४४ वयोगटांसाठीची लसीकरण केंद्रे वेगळी असतील आणि ४५ वर्षे वयोगटांच्या पुढची केंद्रे वेगळे असतील.’’