शासनाच्या नियमांचे पालन केल्यास स्वतःचे पर्यायाने गावाचे रक्षण होऊ शकते, याचा आदर्श बाणूरगड गावातील लोकांनी सर्वांसमोर ठेवला आहे. यांचा आदर्श समोर ठेवून कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.
खानापूर (जिल्हा सांगली) – जगभर थैमान घालणार्या कोरोना विषाणूपासून खानापूर, आटपाडी आणि सांगोला या ३ तालुक्यांच्या सीमेवर वसलेले बाणूरगड मात्र कोरोना विषाणूपासून मुक्त आहे. या गावाची लोकसंख्या केवळ १ सहस्र ३५० आहे.
या गावाने मास्क, सॅनिटाइजर आणि सामाजिक अंतर यांचा अत्यंत काटेकोरपणे वापर करत गेल्या वर्षीच्या प्रारंभीपासून कोरोनाला गावात प्रवेश करू दिला नाही. गावातील ४५ ते ६० वर्षांवरील ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून येथील ग्रामस्थ शासनाचे नियम काटेकोरपणे पाळतात. येथील सरपंच सज्जन बाबर यांनी ग्रामस्थ आणि उपसरपंच कांताबाई गायकवाड यांनी सर्व महिलांमध्ये कोरोनाच्या संदर्भात जागृती केली. यामुळे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या एकोप्यामुळे या गावात कोरोना प्रवेश करू शकला नाही.