अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे एकाच रुग्णवाहिकेतून २२ जणांचे मृतदेह स्मशानभूमीकडे नेल्याचा संतापजनक प्रकार !

  • रुग्णालयाच्या कारभारावर नागरिक संतप्त ! 

  • तीच रुग्णवाहिका रुग्णांसाठी वापरल्याचा नागरिकांचा आरोप

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत कोंबून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. या प्रकरणी येथील रुग्णालयाच्या कारभाराविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (कोरोनाबाधितांचे वाढते मृत्यू लक्षात घेता मृतदेहांवर तात्काळ अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तशी उपाययोजना करणे आवश्यक आहे. – संपादक)

अंबाजोगाई येथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, तसेच शेजारच्या सर्व तालुक्यांतून रुग्ण रुग्णालय आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये भरती होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसमवेतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. २५ एप्रिल या दिवशी येथे ३० मृतदेहांवर एकाच वेळी अंंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले होते.

(म्हणे) ‘आपत्कालीन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो !’ – डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, रुग्णालय

पहिल्या लाटेत रुग्णालयासाठी ५ रुग्णवाहिका होत्या. सध्या २ आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी १७ मार्च या दिवशी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो.

यापुढे तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत ! – शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई

यापुढे कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर तात्काळ अंत्यसंस्कार केले जातील. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.