सातारा, १९ एप्रिल (वार्ता.) – वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील हुतात्मा सैनिक सोमनाथ तांगडे यांच्यावर कृष्णानदीकाठी सोनेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तांगडे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोमनाथ तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथे कर्तव्यावर होते. अचानक आलेला वादळी वारा आणि पाऊस यांमुळे त्यांचा तंबू उखडून गेला होता. तांगडे यांना हिमकण लागून ते बर्फावर आदळल्याने गंभीर घायाळ झाले होते. त्यांना कॉलिंगपाँग येथील सैनिकी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १६ एप्रिल या दिवशी उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले.