नवी देहली – सध्या देशात कोरोना महामारीवर लाभदायक ठरणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. हे औषध वैद्यकीय दुकानात भरमसाठ किमतीत विकण्यात येत आहे. अशा तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. आता शासनाने हे इंजेक्शन प्रधानमंत्री जन-आरोग्य केंद्रावरही स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती ‘ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ऑफ इंडिया’ (पी.एस्.यू.) या संस्थेने दिली आहे. तसेच बाहेर ४ सहस्र रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन ८९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन-आरोग्य केंद्राच्या शाखा देशातील बहुतेक शहरांत कार्यरत आहे. तेथून रुग्णाचे आधारकार्ड, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल, आधुनिक वैद्यांचे लिखित पत्र (प्रिस्क्रिप्शन) आणि औषध विकत घेणार्या व्यक्तीचे आधारकार्ड ही कागदपत्रे दाखवून रेमडेसिविर इंजेक्शन विकत मिळू शकेल.