पणजी, १६ एप्रिल (वार्ता.) – सोमवार, १२ एप्रिल या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झालेले सुनील अरोरा (वय ६५ वर्षे) यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सुनील अरोरा हे वर्ष १९८० मधील राजस्थान कॅडरचे ‘आय.ए.एस्.’ अधिकारी आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी सुनील अरोरा यांनी माहिती आणि प्रसारण सचिवपद सांभाळले आहे, तसेच त्यांनी त्यापूर्वी अनेक प्रशासकीय पदेही सांभाळली आहेत. उत्तम प्रशासकीय अनुभव असल्याने राज्यपालपदासाठी सुनील अरोरा यांच्या नावाची चर्चा होत आहे. सुनील अरोरा हे मूळचे पंजाबमधील आहेत. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी हे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार सांभाळत आहेत.