निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

१७ एप्रिल या दिवशी कुंभमेळा संपेल !

हरिद्वार (उत्तराखंड) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, १७ एप्रिल या दिवशी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेले सर्व संत, महंत यांना परत जाण्याची विनंती करण्यात आली आहे. १७ एप्रिलपर्यंत कुंभमेळा रिकामा होणार आहे.

१. महंत रवींद्र पुरी यांच्या मते, २७ एप्रिल या दिवशी महाकुंभमेळ्याचे पवित्र स्नान होणार आहे. या महाकुंभमेळ्याचे ते शेवटचे पवित्र स्नान असेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २७ एप्रिलचे पवित्र स्नानही केवळ प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्यासह महाकुंभ स्नानाची शाश्‍वत परंपरा कायम राहील.

२. कुंभमेळ्यामधील ३० साधूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  ज्या साधूंची प्रकृती गंभीर आहे त्यांना ऋषिकेशमधील एम्स्मध्ये भरती करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस्.के. झा यांनी दिली.

साधू आणि संत यांचा विरोध

कुंभमेळा समाप्त करण्याला बैरागी आखाड्याने विरोध केला आहे. तसेच द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनीही विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, कुंभमेळा पंचांगानुसार होत असतो. तो आयोजित किंवा रहित करण्याचा अधिकार कोणतीही व्यक्ती किंवा संघटना यांना नाही.