इतरांचा विचार करणारे आणि अल्प अहं असणारे पुणे येथील वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर !

इतरांचा विचार करणारे आणि अल्प अहं असणारे पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर (वय ८० वर्षे) !

पुणे येथील वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर यांनी जून २०२० मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी गुरुपौर्णिमेनिमित्तच्या ऑनलाईन सत्संगात सांगितली. त्यांच्याविषयी त्यांची मुलगी कु. मयुरा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर

१. ‘बाबांचा तोंडवळा नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतो.

२. त्यांची वृत्ती समाधानी असून त्यांच्या मुखावर शांत भाव जाणवतो. त्यांच्याकडे पाहिल्यावर मलाही शांत वाटते.

३. विनम्रता

हा तर त्यांचा स्थायीभावच आहे. इतक्या वर्षांत मी बाबांना कुणाशीही अधिकारवाणीने बोललेले पाहिले नाही. काही कारणांवरून आईशी वाद झाला, तरी नेहमी बाबा माघार घेतात. ते म्हणतात, ‘‘आपण माघार घेतली, तर पुढचे सर्व प्रसंग टाळता येतात आणि वादविवादही टळतात.’’

४. सात्विक रहाणीमान

बाबांचे रहाणीमान, तसेच त्यांचे खाणे-पिणे इत्यादी अत्यंत सात्विक आहे. त्यांना भडक रंग आवडत नाहीत, फिकट रंग आवडतात.

५. इतरांचा विचार असणे

कु. मयुरा आलुर

एकदा ते आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून जात असतांना दुचाकीला अपघात होऊन बाबा गाडीवरून पडले. त्यांच्या पाठीला मुका मार लागला होता; मात्र ही गोष्ट आम्हाला १५ दिवसांनी त्यांच्या मित्रांकडून कळली. त्यांना कधी काही शारीरिक त्रास होत असेल, तर ते आम्हाला त्याविषयी जराही जाणवू देत नाहीत. त्यांच्यात पुष्कळ सहनशीलता आहे, तसेच ‘आपल्यामुळे इतरांना त्रास नको’, असा त्यांचा विचार असतो.

६. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे

बाबा आयुर्वेदीय वैद्य आहेत. त्यांना ‘मेडिकल ऑफिसर’ म्हणून सरकारी नोकरी मिळाली. तेव्हा त्यांची खेडेगावातच नेमणूक झाली. पूर्वी खेडेगावात गैरसोयी असल्याने अन्य वैद्य त्या ठिकाणी जायला सिद्ध होत नसत; परंतु पुण्यात राहिलेले असूनही बाबा त्या ठिकाणी गेले. त्या भागात भाज्या इत्यादी मिळत नसत. तेथील लोक जेवणात मासेच खात असत. अशा स्थितीत बाबांनी केवळ दूध-भात खाऊन ७ – ८ वर्षे काढली. अशी बरीच वर्षे त्यांना कोणत्या ना कोणत्या खेडेगावातच काढावी लागली. असे असले, तरी बाबांच्या बोलण्यात त्याविषयी कोणतेही गार्‍हाणे नसते. उलट त्या स्थितीतही ते आनंदाने रहात असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

७. प्रामाणिकपणाने नोकरी करून वरिष्ठांचा विश्‍वास संपादन करणे

एकदा बाबा ज्या सरकारी कार्यालयात काम करत होते, तेथे नवीन अधिकार्‍याची नेमणूक झाली होती. त्याने मुद्दाम बाबांविरुद्ध खोटीच माहिती त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवली. ती माहिती वाचून त्या वरिष्ठांनी त्या अधिकार्‍यालाच सुनावले आणि तो कागद परत पाठवला. ते म्हणाले, ‘‘आलुर डॉक्टर असे वागूच शकत नाहीत.’’

८. आवड-नावड नसणे

‘त्यांना कोणते पदार्थ आवडतात किंवा कोणते आवडत नाहीत ?’, हे अजूनही आम्हाला नेमकेपणाने ठाऊक नाही. ते कधीच त्याविषयी बोलत नाहीत. ते सर्वच पदार्थ आनंदाने खातात. जेवणातील एखाद्या पदार्थात कधी काही अल्प-अधिक झाले, तरी त्याविषयी त्यांचे कधीच गार्‍हाणे नसते, म्हणजे तसे ते कधी जाणवूही देत नाहीत. आम्ही जेव्हा तो पदार्थ खातो, तेव्हा आम्हाला ते कळते.

९. अहं अल्प असणे

बाबा लहान-मोठ्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात. ते इतरांनी स्वतःहून बोलण्याची वाट पहात नाहीत. वसाहतीतील एक काका कधीच स्वतःहून इतरांशी बोलत नाहीत, तरीही बाबा प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोलायचे. एकदा मी बाबांना सहजच याविषयी विचारल्यावर बाबा म्हणाले, ‘‘आपण कमीपणा घेतला, तर काय बिघडते ? त्यांना कसेही वागू दे. आपण नेहमी चांगलेच वागायचे.’’

१०. मुलीच्या जीवनातील कठीण प्रसंगात स्थिर राहून तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे

माझ्या आयुष्यातील एका कठीण प्रसंगात मला एक निर्णय घ्यावा लागला होता. ‘तो निर्णय आई-बाबांना कसा सांगायचा ?’, याचा मला ताण आला होता; कारण ‘त्या निर्णयाने त्यांना मानसिक त्रास होईल’, असे मला वाटत होते; परंतु तसा निर्णय घेण्यावाचून मला पर्याय नव्हता. मी जेव्हा दोघांनाही (आई-बाबांना) तो निर्णय सांगितला, तेव्हा त्यांनी मला त्या निर्णयात साहाय्य केले. त्या वेळी ते पुष्कळ स्थिर होते आणि त्यांच्यामुळे मलाही स्थिर रहाता आले. एरव्ही पालक ‘समाज आणि नातेवाईक काय म्हणतील ?’, असा विचार करून अशा निर्णयाला विरोध करतात; मात्र माझ्या संदर्भात तसे काहीच झाले नाही. त्यांना समाज आणि नातेवाईक यांना सामोरे जावे लागत असतांना त्याविषयी त्यांनी मला कधीच तसे जाणवू दिले नाही.

११. इतरांवर स्वतःचे मत न लादणे

बाबा इतरांनी विचारल्याविना स्वतःचे मत कधीच व्यक्त करत नाही. ‘कुटुंबप्रमुख म्हणून घरच्यांनी माझे ऐकावे’, असा त्यांचा कधीच आग्रह नसतो. काही प्रसंगांत त्यांनी स्वतःचे मत मांडले, तरी त्या वेळी ‘मला असे वाटते’, असे त्यांचे बोलणे असते. आम्हा तिघा भावंडांना त्यांनी आमच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊ दिले. तिथेही त्यांनी आमच्यावर स्वतःचे मत कधीच लादले नाही.

१२. मुलीला साधनेत साहाय्य करणे

अ. या वयातही बाबा आईला ‘केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे’ इत्यादी घरकामांत साहाय्य करतात. आई कधी आजारी असल्यावर जेवणाच्या संदर्भात अडचण येते. त्या वेळी ‘मी घरी येऊन साहाय्य करायला हवे’, अशी त्यांची अपेक्षा नसते. ‘माझ्या साधनेत खंड पडायला नको’, असा त्यांचा विचार असतो.

आ. आरंभी मला साधना कळली. तेव्हा त्यांनी मला कधीच विरोध केला नाही. काही वर्षांनी मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही आई-बाबा म्हणाले, ‘‘तुझी इच्छा आहे, तर तू पूर्णवे ळ साधना कर.’’

१३. निरपेक्षता

मी सेवेसाठी भ्रमणसंगणक घेऊन आश्रमातून घरी जाते. तेव्हा घरातील काम आटोपल्यावर मी सेवेसाठी बसते. त्या वेळी ते सायंकाळी काही वेळ माझ्याशेजारी येऊन बसत. तेव्हा ‘त्यांना वेळ द्यायला हवा’, असे वाटून मी भ्रमणसंगणक बंद करत असे. त्या वेळी ते म्हणत, ‘‘बंद करू नकोस. तुझी सेवा चालू ठेव. तुझ्या सेवेत व्यत्यय नको. मी केवळ बघत बसतो.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला भरून येत असे. ‘मी घरी आले आहे. त्यांच्याशी बोलायला वेळ द्यायला हवा’, अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही किंवा गार्‍हाणेही केले नाही. मी घरी आली आहे, यातच ते आनंद मानत.

१४. समाजात ‘देवमाणूस’ अशीच त्यांची ओळख आहे.

१५. देवाच्या अनुसंधानात असणे

बाबा श्रीकृष्णाचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करतात. बाबा कामानिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा त्यांचा नामजप आपोआप चालू होतो. त्यांच्याकडे पाहिले की, ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटते.

१६. भाव

अ. त्यांच्या नोकरीचा काळ कठीण होता. कधी सहकारी चांगले नसत, तर कधी वरिष्ठ चांगले नसत. त्या सर्व प्रसंगांविषयी बोलतांना ‘मल्लिकार्जुनानेच (कुलदेवानेच) तारून नेले’, असेच ते म्हणतात. त्यांची मल्लिकार्जुनावर श्रद्धा आहे. ‘कोणताही प्रसंग त्याच्याच इच्छेने घडत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

आ. घरात काही निर्णय घ्यायचे असल्यास ते ‘साधकांना (म्हणजे मला) विचारूया’, असे म्हणतात. ‘मी साधिका असल्याने मी दिलेला निर्णय योग्यच असणार’, असा त्यांचा भाव असतो; परंतु मला वाटते, ‘तेच खरे साधक आहेत.’

इ. काही वर्षांपूर्वी माझे बाबा महेशच्या (माझा भावाच्या) उपचारासाठी मुंबईला गेले होते. तेथे त्यांची भेट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झाली होती. बाबा त्या वेळची आठवण सांगतात, त्या वेळी मला बाबांच्या बोलण्यातून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव जाणवतो.

‘परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेनेच मला असे वडील मिळाले आहेत. त्याविषयी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘बाबांमधील गुण मला आत्मसात करता येऊ दे आणि माझ्यात त्यांच्याप्रमाणे साधकत्व येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

-कु. मयुरा आलुर (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक