नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हाधिकारी उत्तरदायी ! – हिना गावित, खासदार

हिना गावित

नंदुरबार – जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकार्‍यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. अडीच सहस्र रेमडेसिविरची लस असतांना सामान्य नागरिकांना ते दिले नाही. यामुळेच कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर वाढला आहे. याला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हेच उत्तरदायी आहेत, असा आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी १३ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केला. ‘जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात राज्यासह केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की,

१. जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. राज्य सरकारकडून उपाय योजनांच्या संदर्भात पत्र प्राप्त होऊनही जिल्हाधिकारी डॉ. भारूड हे गांभीर्याने उपाययोजना करत नाहीत.

२. ऑक्सिजन आणि खाटांसह रेमडेसिविर लसीचा तुटवडा जाणवत असून याच्याअभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला मिळालेली रेमडेसिविर लस कोविड रुग्णांना देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी देऊनही जिल्हाधिकार्‍यांनी तो पुरवठा केलेला नाही.

३. अद्यापही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर लससाठी भटकंती करावी लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे कठोर ‘दळणवळण बंदी’ची मागणी करूनही त्यांनी त्याची नोंद घेतली नाही.

४. जिल्ह्यात सध्या १ लाख व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचा अंदाज आहे; परंतु प्रत्यक्षात त्यांची पडताळणी झालेली नाही. अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण असूनही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.

५. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी प्राप्त झालेले रेमडेसिविर लस कोविड रुग्णांना वाटप करणे आवश्यक आहे; परंतु एका पत्राच्या आधारावर जिल्हाधिकारी

डॉ. भारूड यांनी एका सेवाभावी संस्थेला १ सहस्र लस दिले. यामुळे रुग्णालयातील रुग्ण लसीपासून वंचित राहिले. शहरातील एका रुग्णालयाने रेमडेसिविरची लस देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती; मात्र त्यांनी त्या रुग्णालयाला लसीचा पुरवठा केला नाही.