राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ११.४.२०२१

हे भारताला लज्जास्पद !

‘भारतीय उच्च न्यायालयांमध्ये ५ लाख खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपिठाने याची नोंद घेत हे खटले निकालात काढण्यासाठी उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधिशांना नेमण्यासाठी कधीही न वापरलेल्या घटनात्मक तरतुदीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने या पदांवर नियुक्तीसाठी ४५ नावांची शिफारस केली होती; मात्र ‘केंद्र सरकारने हे सूत्र प्रलंबित का ठेवले आहे ?’ असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केंद्र सरकारला विचारला आहे.’


हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते. आंध्रप्रदेशमधील २४ सहस्र ६३२ हिंदु मंदिरे कह्यात घेतली गेली, असे मी मानतो. या सर्व मंदिरांची ४ लाख एकर भूमी शासकीय अधिपत्याखाली आहे. यात १ लाख एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर हे राष्ट्र हिंदु राष्ट्र करावे आणि मग शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी.


 सरकारने चिकमंगळूरचे दत्तपीठ हिंदूंच्या कह्यात द्यावे ! – प्रमोद मुतालिक,राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

चिकमंगळूर हे कर्नाटकातील श्री दत्तात्रेयांनी तप केलेले अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. तेथे गुरु दत्तात्रेयांची गुहा आणि पादुका आहेत; पण टिपू सुलतानाच्या काळात तेथे बाबा बुडनगिरी दर्गा असे नाव देऊन मुसलमानांनी ते कह्यात घेतले. आम्ही १९९७ या वर्षी या विरोधात आंदोलन चालू केले. गेली २० वर्षे आम्ही लढत आहोत. राणी चन्नम्मा, आदि शंकराचार्य यांनी स्थापिलेले शृंगेरी पीठ आणि मैसूरचे राजे वडियार यांच्याकडून या दत्तपिठासाठी निधी दिला जात असल्याची नोंद इतिहासात सापडते. सरकारी नोंदीत आजही त्याचे नाव दत्तात्रेय पीठ आहे. राज्य सरकारकडे याचा निकाल देण्याचे आदेश दिले गेले आहेत. कर्नाटकात सध्या भाजपचे राज्य आहे. त्यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा करतो.