नगर येथे एकाचवेळी २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर एकाच शववाहिकेत कोंबले अनेक मृतदेह !

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन उपाययोजना न काढणारे सुस्त प्रशासन !

नगर, १० एप्रिल – येथे कोरोनामुळे प्रतिदिन सरासरी १५ ते २० जणांचा मृत्यू होत आहे. ९ एप्रिलला एकाच वेळी एकाच स्मशानभूमीत २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसमवेतच अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जात आहेत, तर विद्युत्दाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. वर्षभरापूर्वी अशाच अडचणी आल्या होत्या; मात्र त्यावर ना महापालिकेने उपाय केला, ना जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातले. त्यामुळे कोरोनाबाधितांंच्या मृत्यूनंतरही नातेवाइकांच्या भावनेशी खेळ चालूच आहे.

कोरोनाबाधित रुग्णवाढीच्या विषयी नगर जिल्हा देशातील ‘टॉप टेन’ जिल्ह्यांमध्ये आहे. दिवसाला येथे २ सहस्रांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या १२ सहस्रांच्या घरात गेली आहे. आतापर्यंत १ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे. ९ एप्रिल या दिवशी हा आकडा ४८ वर गेल्याने यंत्रणा कोलमडून पडली. क्रमांक येईपर्यंत मृतदेह तसेच शववाहिकेत घंटोन्घंटे पडून असतात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाइकांनाही नगर शहरात येऊन घंटोन्घंटे ताटकळत बसावे लागते. सगळेच दु:खात असल्याने यंत्रणेला खडसावण्याचे भानही नसते.