कोल्हापूर, १० एप्रिल – रासायनिक खतांच्या दरात पोत्यामागे ४२५ ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते. दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही. तरीही खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती अल्प करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
दादा भुसे पुढे म्हणाले, यंदा पावसाळा चांगला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाची सिद्धता जोमाने केली असून स्थानिक पातळीवर पाणी, आरोग्य समित्यांप्रमाणे कृषी ग्रामविकास समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून खरिपाचा आराखडा सिद्ध करून तो तालुका, जिल्हा, विभाग आणि मग राज्याकडे येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतीशील आहे. ते वेगवेगळ्या प्रयोगात पुढे रहातात. त्यामुळे येथे चहाचे मळे, मध संकलन केंद्र आदींना प्रोत्साहन द्यायचे असून एक गाव एक वाण ही संकल्पना रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे.