कोरोनाच्या विरोधातील लसीकरण वाढवण्यासाठी गोव्यात ११ एप्रिल ते २० एप्रिल ‘टीका उत्सव’ मोहीम राबवणार !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आवश्यकता भासल्यास मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) – गोवा राज्यात कोरोनाच्या विरोधातील लस घेण्यासंबंधीचे प्रमाण वाढवण्यासाठी ११ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत ‘टीका उत्सव’ ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘या दिवसांत पंचायत पातळीवर मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जाईल. याविषयी समाजात जागृती करून योग्य व्यक्तींना लसीकरण केंद्रात पाठवण्यासाठी युवकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, अशी मी युवकांना विनंती करतो.’’ आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले, ‘‘ही लस जनतेच्या दारापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य केंद्रे, तसेच शासकीय रुग्णालये यांसमवेत ग्रामीण पातळीवर लसीकरण मोहीम राबवली जाईल. समाजातील सर्वांनी दायित्वाने वागून, मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.’’

राज्यात दिवसभरात ४२८ कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात ८ एप्रिल या दिवशी कोरोनाच्या २ सहस्र ७६१ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी कोरोनाबाधित ४२८ नवीन रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात १५९ रुग्ण बरे झाले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये अमेरिकेहून आलेल्या एका पर्यटकाचाही समावेश आहे. राज्यात प्रत्यक्ष उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ३ सहस्र ५९७ झाली आहे, तर एकूण मृत्यू ८४५ झाले आहेत.