नागपूर येथे संचारबंदीला व्यापार्‍यांचा विरोध

दुकाने चालू ठेवण्याच्या मागणीसाठी व्यापारी रस्त्यावर !

नागपूर – जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’च्या अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांच्या नावावर दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात ८ एप्रिल या दिवशी व्यापारी रस्त्यावर उतरले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या वेळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रारंभी अनेक बंधने घालून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती व्यापार्‍यांना देण्यात आली होती; मात्र कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने प्रशासनाकडून ‘मिनी दळणवळण बंदी’ घोषित करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यापार्‍यांना यापूर्वीही संचारबंदीमुळे पुष्कळ हानी सहन करावी लागली आहे. आताही संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ आल्याने व्यापार्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. या वेळी सीताबर्डी परिसरात व्यापार्‍यांनी दुकानांपुढे गर्दी केली होती. पोलिसांनी व्यापार्‍यांची समजून काढत नियम न मोडण्याची विनंती केली. दुकाने उघडण्याची अनुमती न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी व्यापार्‍यांच्या वतीने देण्यात आली आहे.