अमरावती महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना अटक

२ कोटी ४९ लाख रुपयांचे शौचालय अपहार प्रकरण

प्रेमदास राठोड

अमरावती – येथील महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ कोटी ४९ लाख रुपयांच्या शौचालय अपहार प्रकरणी ८ एप्रिल या दिवशी अटक केली. या प्रकरणात काही बनावट कंत्राटदार आणि महापालिकेतील रोजंदारी लिपिक यांचाही समावेश आहे. यापूर्वीही प्रेमदास राठोड यांना कह्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने २ दिवस त्यांची चौकशी केली होती, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

वर्ष २०२० मध्ये २ कोटी ४९ लाख रुपयांचे शौचालय अपहार प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. संबंधित प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. त्यात आतापर्यंत अन्वेषण यंत्रणेने एकूण ९ जणांना अटक केली आहे. बांधकाम केले नसतांना बनावट प्रस्ताव सिद्ध करून शौचालयांचे बांधकाम झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तशी देयके सादर करून पैसेही काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला !

आजारी असल्याने राठोड बरेच दिवस रुग्णालयात भरती होते. याच काळात त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तेव्हा काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांना अमरावती जिल्हा न्यायालयापुढे आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी ६ एप्रिल या दिवशी जिल्हा न्यायालयापुढे आत्मसमर्पण केले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

न्यायालयाने राठोड यांना अटक करण्याची अनुमती दिली !

या प्रकरणात राठोड यांना चौकशीसाठी अटक करणे आवश्यक असल्याची विनंती पोलिसांनी ७ एप्रिल या दिवशी न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यानंतर न्यायालयाने राठोड यांना जिल्हा कारागृहातून कह्यात घेऊन अटक करण्याची अनुमती दिली.