पुणे, ४ एप्रिल – जिल्ह्याचे माहिती अधिकारी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे ३ एप्रिल या दिवशी पहाटे ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी आणि पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय अन् माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र सरग यांनी पुण्यासमवेत बीड, नगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते विनामूल्य व्यंगचित्र करून देत असत.