नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या झाडून हत्या !

  • नक्षलवादी थेट लोकवस्तीमध्ये घुसून लोकप्रतिनिधींना ठार मारतात. यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नाही, हे स्पष्ट होते. असे असतांनाही त्याविरोधात पावले उचलली जात नाहीत, हे लज्जास्पद !
  • नक्षलवाद्यांपासून जेथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील, तेथे सामान्य लोकांच्या सुरक्षेविषयी विचारही न केलेला बरा !
रामा तलांडी

गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (वय ३७ वर्षे) यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ३ एप्रिलच्या रात्री १० वाजता ही घटना घडली. तलांडी हे बुर्गी ग्रामपंचायतमध्ये १० वर्षे उपसरपंच होते. बुर्गी येथे एका विवाह समारंभात तलांडी हे डीजे लावत असतांना साध्या वेशात आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर २ गोळ्या झाडून ते अरण्यात पसार झाले. यात तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्या वेळी तलांडी यांनी फडणवीस यांच्याकडे बुर्गी येथे रस्ते बांधण्याची आणि ‘मोबाईल टॉवर’ उभारण्याची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तलांडी यांचा पराभव झाला होता.