सतत हसतमुख, परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या आणि आनंदी राहून इतरांना साहाय्य करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कै. विनया राजेंद्र पाटील !

कै. विनया राजेंद्र पाटील

कुडाळ येथील साधिका सौ. विनया (सौ. रेश्मा) राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. आज त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुडाळ येथील सहसाधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. 

१. सौ. सुप्रिया वारखणकर, पिंगुळी

१ अ. परिपूर्ण सेवा करणे : ‘सौ. विनया आणि मी पुष्कळ वेळा एकत्रित सेवा करायचो. सौ. ताई दायित्व घेऊन सेवा करायच्या. सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी तळमळीने आणि परिपूणर्र् कशी करता येईल, याकडे त्यांचे लक्ष असायचे.

१ आ. शांत आणि प्रेमळ : ताईंचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता. त्या नेहमी दुसर्‍यांचा विचार करायच्या.

१ इ. गुरुदेवांप्रती भाव : गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा होती. ‘गुरुदेवच सर्व काही करणार आहेत’, असा तिचा भाव असायचा.

२. श्री. आनंद नाईक, आंबडपाल

२ अ. सतत साधनारत असणे : सौ. विनयाताई कुडाळ केंद्रात सतत साधनारत होत्या. गेली २० वर्षे मी त्यांच्या समवेत प्रसारसेवेत होतो.

२ आ. प्रेमभाव : ताई नेहमी भेटल्यावर घरची चौकशी आपुलकीने करायच्या. काही अडचणी असल्या, तर बहिणीच्या मायेने समुपदेशही द्यायच्या. माझ्या प्रसारसेवेत चुका दिसून आल्या, तर प्रेमळपणे त्याची जाणीव करून द्यायच्या. हे इतक्या सहजपणे सांगायच्या कि त्यांच्या बोलण्यामुळे सहजपणे स्वीकारता यायचे.

२ इ. सोशिक वृत्ती : एवढे त्रासदायक आजारपण असतांनाही १५ दिवसांपूर्वी पाहिले असतांना त्या आजारी आहेत, यांवर माझा तीळमात्रही विश्‍वास बसला नव्हता. त्या अंतापर्यंत अढळ आणि स्थिर राहिल्या.

३. सौ. प्रणिता तवटे, पाट

३ अ. सतत हसतमुख आणि आनंदी : सौ. विनयाला बघितल्यावर पुष्कळ आनंद वाटायचा. ती सतत हसतमुख आणि आनंदी असायची.

३ आ. लहान मुलीचे संगोपन करतांना तिला समवेत घेऊन प्रसार आणि सर्व सेवा करणे : तिला लहान मुलगी असूनही ती सर्व प्रकारच्या सेवा करत होती. धर्मसभा, बालसंस्कार वर्ग घेणे, धर्मप्रसार करणे, प्रवचन घेणे, विज्ञापन सेवा, वैयक्तिक संपर्क करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, स्वयंपाक घरामध्ये सेवा करणे, शिबिराचे नियोजन करणे, आश्रमासाठी खाऊचे नियोजन करणे, स्वरक्षण प्रशिक्षण घेणे, या सर्व सेवा करता करता ती आपल्या कर्तव्यांकडेही लक्ष द्यायची. चि. राधिकाचे (मुलीचे) पूर्ण संगोपन तिने सर्व सेवा सांभाळून केले आहे.

३ इ. व्यवस्थितपणा : सौ. विनया कुठेही सेवेला गेली, तर अशा वेळी राधिकालाही (मुलीलाही) समवेत घेऊन जायची. त्या वेळी तिच्या खांद्याला एक पिशवी असायची. त्यामध्ये व्यवस्थितपणे ठेवलेला राधिकासाठी खाऊचा डबा, पाण्याची बाटली, कपडे आणि झोपण्यासाठी अंथरूणसुद्धा ती समवेत घेऊन जायची.

३ ई. चुका प्रांजळपणे मांडणे : स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवत होती. शुद्धी सत्संगामध्ये स्वतःकडून ज्या काही चुका व्हायच्या, त्या ती सतत मांडत असे.

३ उ. परिपूर्ण आणि चुकांविरहित सेवा करण्याची वृत्ती असणे : प्रथमोपचार वर्गामध्ये ती पूर्ण अभ्यास करून विषय मांडत असे. काही समजले नाही, तर पुनःपुन्हा विचारून घेत असे. धर्मप्रसार करत असतांना समाजामध्ये कोणीही कोणताही प्रश्‍न विचारला, तर अभ्यासपूर्ण आणि योग्य उत्तर देत असे.

४. सौ. संपदा संदीप चिऊलकर, कुडाळ सेवाकेंद्र

४ अ. आध्यात्मिक सखी : प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा, भाव, सेवेची तळमळ, कृतज्ञताभाव आणि प्रेमभाव या गुणांनी युक्त अशी ती माझी प्रेमळ आध्यात्मिक सखी होती.

४ आ. वृत्ती अंतर्मुख असणे : ‘एका लयीत बोलणे, हसरा आणि आनंदी तोंडवळा, सतत अंतर्मुख वृत्ती हे सर्व पहाता ती अंतर्मनातून देवाच्या अनुसंधानातच आहे आणि सतत सेवेच्याच विचारात आहे’, असे वाटायचे.

४ इ. ‘प्रसंगातून स्थिर राहून योग्य दृष्टीकोन घेऊन पुढे कसे जायचे’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळणे : ताई बोलतांना कधीच कुणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. ‘प्रसंगातून स्थिर राहून योग्य दृष्टीकोन घेऊन पुढे कसे जायचे ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळायचे. ताई माझ्यापेक्षा वयाने लहान होती; परंतु अल्प कालावधीतही साधनेच्या दृष्टीने मला पुष्कळ काही शिकवून गेली.

५. सौ. लक्ष्मी परशुराम धामणेकर, सांगिर्डेवाडी

५ अ. प्रेमभाव : सौ. विनयाताई कोणाशीही बोलतांना प्रेमभाव असायचा. प्रसाराला जातांना समाजातल्या लोकांसमवेत बोलतांना प्रेमभावाने बोलायची.

५ आ. हट्टीपणा करत असल्यास मुलीलाही सहजतेने समजावून सांगणे : ताईंची मुलगी हट्टीपणा करत असल्यास ‘तिला शांतपणे कसे समजावून सांगायचे ?’, हे मला ताईंकडून शिकायला मिळाले.

६. श्री. वामन परब, पिंगुळी 

६ अ. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना सहजतेने संपर्क करणे : दोन वर्षांपूर्वी मी बदली (चाकरीतून) होऊन कुडाळला आलो. तेव्हा सौ. रेश्माताई यांनी माझा सेवेतील सहभाग वाढवला. वैयक्तिक संपर्क करणे, नियतकालिक वर्गणीदार नूतनीकरण करणे, नवीन वर्गणीदार करणे, प्रवचन घेणे या सेवेसाठी त्या माझ्या समवेत यायच्या. तेव्हा ताईंविषयी समाजात असलेला विश्‍वास लक्षात यायचा. समाजात अधिवक्ता, करसल्लागार, आधुनिक वैद्य, शिक्षक इत्यादी व्यक्तींच्या घरी ताई हक्काने जायच्या आणि त्यांना साधना सांगायच्या. त्या वेळी ताईची सेवेची तळमळ लक्षात यायची.

६ आ. सेवेशी एकरूप असणे : ताई कुडाळ केंद्राची विज्ञापन सेवा पहात होत्या. त्या आपल्या सेवेशी एवढ्या एकरूप होत्या की, त्यांच्याकडे असलेल्या सेवांविषयी मी निश्‍चिंत असायचो. कुडाळ केंद्रातील सेवा बघतांना मला ताईंचे पुष्कळ साहाय्य व्हायचे.

६ इ. चुका स्वीकारून सतत शिकण्याच्या स्थितीत असणे : ताई प्रसारातील सेवेमधील, तसेच विज्ञापन सेवेमध्ये होणार्‍या स्वतःच्या चुका प्रांजळपणे मांडायच्या. त्यांचा व्यष्टीचा आढावा माझ्याकडे असल्याने आढावा घेतांना मलाही त्यांच्याकडून अनेक दृष्टीकोन शिकायला मिळायचे. आढाव्याच्या वेळीही ताई मनमोकळेपणाने बोलायच्या. त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असायच्या.

६ ई. मृतदेहाजवळ बराच वेळ थांबूनही कोणत्याही प्रकारचा त्रास न जाणवणे : ‘ताईंच्या मृतदेहाजवळ बराच वेळ थांबूनही मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. उलट त्या रात्री मला शांतपणे झोप लागली. ताई जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या असाव्यात’, असा विचार मनात आला. ताईंच्या निधनानंतर समाजातील त्यांच्या संपर्कातील अनेक जिज्ञासूंनी हळहळ व्यक्त केली.

७. सौ. वैष्णवी वामन परब, पिंगुळी

७ अ. जिज्ञासूंना अर्पण देण्याविषयीचे महत्त्व सांगतांना ताईंच्या वाणीमध्ये चैतन्य जाणवणे : जिज्ञासूंना अर्पण देण्याविषयीचे महत्त्व सांगतांना ताईंच्या वाणीमध्ये चैतन्य जाणवत असे. समोरचे जिज्ञासू त्यांचे बोलणे एकाग्रतेने ऐकत असत. ताईंच्या समवेत अर्पण गोळा करणे, पंचांग वितरण करणे अशा सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळायचा. ताई आमच्याकडे आल्या की, ‘त्या आमच्या घरातीलच आहेत’, असे वाटायचे.

८. श्री. वासुदेव कृ. सडवेलकर, पिंगुळी केंद्र

८ अ. गुरुकार्य चांगले व्हावे, याची तळमळ असणे : सौ. विनया पाटील हिचे अल्पशा आजाराने निधन झाले, हे समजल्यावर पुष्कळ वाईट वाटले. तिची सेवेच्या निमित्ताने ओळख झाली होती आणि नंतर ‘ती पुष्कळ जवळची आहे’, असे वाटायचे. ‘गुरुकार्य चांगले व्हावे’, यासाठी तिची तळमळ असे.

९. सौ. मंजुषा खाडये 

९ अ. वयाने लहान असूनही मैत्री असणे : मी १९९८ मध्ये साधनेला प्रारंभ केला आणि वर्ष १९९९ च्या गुरुपौर्णिमेच्या सेवांपासून सौ. विनयाची आणि माझी ओळख झाली. ती माझ्यापेक्षा ४ – ५ वर्षांनी लहान, तरीही आमची मैत्री होती.

९ आ. सेवेची तळमळ : वर्ष २००० मध्ये आम्ही दोघीही पूर्णवेळ झालो आणि तळेबझार सेवाकेंद्रात सेवा करू लागलो. तिचे घर तिथेच होते; पण महाविद्यालयातून ती थेट सेवाकेंद्रात यायची आणि मग घरी जायची. त्या वेळी ती दैनिक वितरण, प्रशिक्षणवर्ग घेणे, सत्संग घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, जत्रांमध्ये प्रसार करणे इत्यादी सेवा करायची.

९ इ. समोरच्या व्यक्तींना समजून घेऊन साधनेची नेमकी सूत्रे सांगणे आणि संपर्कातील पुष्कळ जणांनी साधना चालू करणे : वर्ष २००२ मध्ये लग्नानंतर आम्ही दोघीही कणकवलीत स्थायिक झालो. तिथेही आम्ही एकत्र सेवा करायचो. तिचा स्वभाव शांत असल्याने ती समोरच्यांना पुष्कळ चांगले समजून घ्यायची आणि साधनेची नेमकी सूत्रे सांगायची. तिच्या संपर्कातील पुष्कळ जणांनी काहीना काही साधना चालू केली होती.

९ ई. सासू-सासर्‍याची सेवा विनातक्रार करणे : लग्नानंतर आमच्या घरी सर्वच साधक होते; पण तिच्या घरी केवळ यजमान साधक होते. ती सासू-सासर्‍यांची सेवा कसूर न ठेवता करायची.

९ उ. परिस्थिती स्वीकारणे : कोल्हापूरला खरेदी करतांना तिने स्वतःसाठी पैठणी साडी घेतली होती. घरी आल्यावर काही दिवसांनी ती स्वतःसाठी न ठेवता तिने ती सासूबाईंना दिली. सतत सर्व स्वीकारून साधना करत राहिली.

९ ऊ. गरोदरपणात सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळणे आणि त्याचा पुष्कळ लाभ होणे : वर्ष २००९ मध्ये आम्ही दोघीही कुडाळला घर घेऊन रहायला आलो. तिचा २ वेळा गर्भपात झाला असूनही खचून न जाता तिने सेवा चालूच ठेवली. जानेवारी २०१५ मध्ये तिला राधिका झाली. गरोदरपणात सद्गुरु स्वातीताईंच्या कृपेने तिला सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. त्याचा तिला पुष्कळ लाभ झाला.

९ ए. कुडाळ, पिंगुळी परिसरात तिने पुष्कळ जणांना साधनेशी जोडणे : कुडाळ, पिंगुळी परिसरात तिने पुष्कळ जणांना साधनेशी जोडले होते. निधनापूर्वी साधारण १ मासापूर्वी तिने जणू सर्व माहीत असल्याप्रमाणे विज्ञापनाची सेवा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू केली.

९ ऐ. प्रकृती ठीक नसतांना प.पू. गुरुदेवांच्या चरित्र ग्रंथातील त्यांच्या आजारपणातील छायाचित्रांची आठवण करून देणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या आवाजातील तोटकाष्टकम् स्तोत्राचा अर्थ आणि स्तोत्र ऐकवणे : २२.३.२०२१ या दिवशी मी रेश्माला (सौ. विनयाला) न्याहारी द्यायला गेले. तेव्हा ती पोटाला ओढणी बांधून झोपली होती. मला पुष्कळ वाईट वाटले; पण तिचा उत्साह वाढावा; म्हणून तिला प.पू. गुरुदेवांच्या चरित्र ग्रंथातील त्यांच्या आजारपणातील छायाचित्रांची आठवण करून दिली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या आवाजातील तोटकाष्टकम् स्तोत्राचा अर्थ आणि स्तोत्र ऐकवले. त्यावर ती झोपलेली होती, तरी ती उठून बसली आणि म्हणाली, ‘‘हो छाया, आपल्याला प्रयत्न करायला हवेत.’’

९ ओ. अत्यवस्थ स्थितीतही साधनेची तळमळ : तिला खूप बरं नसल्याचे मला समजले. भेटल्यावर ‘‘मी तिला स्वयंसूचनांचे सत्र करतेस का ?’’, असे विचारले. तेव्हा ती ‘‘नाही’’, म्हणाली. मी तिला स्वयंसूचना करून देण्यासाठी प्रसंग लिहून पाठवायला सांगितले. तिने दुसर्‍याच दिवशी जमेल तशा अक्षरात प्रसंग पाठवले. मी तिला स्वयंसूचना करून त्याचे छायाचित्र पाठवले; परंतु तोपर्यंत ती कोमात गेली होती.

१०. कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  

१० अ. उत्तम निरीक्षणक्षमता असणे : रेश्माताई काही दिवस कुडाळ सेवाकेंद्रात रहाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी सेवाकेंद्रात दुरुस्ती संदर्भात किंवा काही सूत्रे असल्यास काढायला सांगितली होती. त्या वेळी रेश्माताईंनी बरीच लहान लहान सूत्रे लिहून काढली होती. ‘त्यांनी काढलेली सूत्रे बैठकीत मांडल्यानंतर सेवाकेंद्रात चैतन्य निर्माण होण्यासाठी ती योग्य आहेत’, असे लक्षात आले. यातून ती काही दिवस रहायला आलेली असूनही तिची एवढी उत्तम निरीक्षणक्षमता असल्याचे शिकता आले.

१० आ. सतत सकारात्मक राहून आनंदाने सेवा करणे : ताई घरातील सर्व कामे करून प्रसारात सेवेला जायच्या. त्यानंतर प्रसारातून सेवाकेंद्रात महाप्रसादासाठी यायच्या. त्या वेळी आश्रमात साधकसंख्या न्यून असल्याने त्यांना काही सेवा करायला लागायच्या. प्रसारातून सेवा करून दमून आल्या असतांनासुद्धा त्या कधीच सेवा करण्यासाठी सवलत घ्यायच्या नाहीत. त्या सतत सकारात्मक राहून आश्रमातील सेवा आनंदाने  करायच्या.

११. श्री. राजाराम परब, तेर्सेबांबर्डे

११ अ. ‘विज्ञापन गुरुचरणी अर्पण व्हायलाच हवे’, अशी तळमळ असणे : सौ. विनयाताईंशी माझा संपर्क विज्ञापन सेवेच्या निमित्ताने अनेकदा होत असे. ‘इतरांची सेवाही परिपूर्ण व्हायला हवी’, असे त्यांना वाटायचे. एकदा एका विज्ञापनदात्याचा मजकूर घेतांना उपकेंद्रामधील साधकांना अडचण येत होती. तेव्हा ताईंनी स्वतः त्या विज्ञापनदात्यांचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांच्याशी बोलून त्या मजकुराची निश्‍चिती केली. ‘ते विज्ञापन गुरुचरणी अर्पण व्हायलाच हवे’, अशी ताईंची तळमळ होती.

११ आ. आजारपणातही स्थिर असणार्‍या विनयाताई ! : विनयाताई यांना गेले वर्षभर विविध प्रकारचे त्रास होत होते. हे मला ठाऊक नव्हते. त्या आजाराची तीव्रताही जास्त होती; पण ‘ताईंच्या बोलण्यातून त्यांना अशा प्रकारचा त्रास होत होता’, असे मला त्यांना सेवेनिमित्त भेटल्यावर आणि बोलल्यावर कधीच वाटले नव्हते. त्या शांत, स्थिर आणि तेवढ्याच आनंदी असल्याचे जाणवले. त्यांना एवढा त्रास होता, हे ताईंच्या निधनानंतर समजले.

११ इ. ताईंच्या मृत्यूपूर्वी वातावरणात दाब जाणवणे आणि नंतर वातावरण मोकळे होणे : ताईंचे निधन होण्याच्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत वातावरणात प्रचंड दाब जाणवत होता. दुपारी १२ वाजल्यानंतर वातावरण एकदम मोकळे झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता ताईंचे निधन झाल्याचे समजले. ‘भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त’, हा नामजप लावल्यानंतर वातावरण, माझे मन आणि शरीर पुष्कळ हलके झाल्याचे जाणवले.

‘गुरुमाऊलींनी त्यांचा पुढील प्रवास आपल्या समवेत ठेवून करावा’, अशी आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. – कुडाळ येथील सर्व साधक