देवाची आवड असणार्‍या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्‍या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !

‘३.४.२०२६ या दिवशी माझी आई (श्रीमती) सुमती गजानन नाखरे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती सुमती नाखरे

१. प्रेमभाव 

‘आई घरात चालू शकत असतांना ‘मी किंवा माझी बहीण घरी येणार’, असे तिला समजल्यावर ती दारात मीठ-मोहरी घेऊन उभी असायची.

२. देवाची आवड 

ती नेहमी ‘शिवलीलामृत आणि व्यंकटेश स्तोत्र’ म्हणत असे. तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यापासून ती ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करत असे. रामनवमीच्या दिवशी मी आईकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करून घेतला. मी जवळ दिसले नाही, तर ती मला हाक मारायची आणि नामजपाची आठवण करायची. दिवसातून २ – ३ वेळा श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणायची. रात्री झोप आली नाही, तर ती श्रीरामरक्षा म्हणायची.

३. त्यागी वृत्ती 

सौ. वैभवी पाध्ये

मी तिच्याकडे गेल्यावर ती मला विचारायची, ‘‘आता कसले अर्पण द्यायचे आहे का ?’’ ‘गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ या वेळी ती आठवणीने अर्पण देत होती.

४. मुलीला सेवेला प्राधान्य देण्यास सांगणे 

आईला ‘मी (साधिका) ४ दिवस तिच्याकडे रहावे’, असे वाटत असे. काही वेळा मी तिला सांगत असे, ‘‘मला सेवा आहेत. मला यायला जमणार नाही.’ तेव्हा तिचा आग्रह नसायचा. ती मला म्हणायची, ‘‘आधी सेवा कर. नंतर ये.’’

५. रुग्णाईत असतांनाही आनंदी असणे

१३.३.२०२६ या दिवशी तिला पक्षाघाताचा झटका (‘पॅरॅलिसिस’चा ‘अटॅक’) आला. तिचा डावा हात आणि पाय यांची जराही हालचाल होत नव्हती. त्याही स्थितीत ती आनंदी होती. तिचे इतरांना सर्व करावे लागायचे. त्या वेळी आईला पुष्कळ अपराधी वाटायचे. मी तिची सेवा करण्यासाठी २३ ते ३१.३.२०२६ या कालावधीत गेले होते. तेव्हा ती सतत ‘मला झोपव किंवा उठव’, असे ती म्हणत असे. तेव्हा ती प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवत असे. माझ्या ‘कपड्यावरील नक्षीकाम किती छान आहे !’, असे बोलून वातावरण प्रसन्न करायची. सर्व भावंडांमध्ये तिचे माझ्यावर प्रेम होते. मलाही तिच्या सहवासात पुष्कळ आनंद मिळायचा. सनातनचा ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा ‘साधना’ म्हणून कशी करावी ?’, हा लघुग्रंथ मी २ -३ वेळा वाचला होता. त्यात सांगितल्याप्रमाणे मी आईची सेवा केली.

६. आई रुग्णाईत असतांना मी तिची सेवा करण्यासाठी माहेरी गेले होते. त्या वेळी मी घरी राहून सेवाही करत होते. तेव्हा मला आनंद मिळत होता. ३१.३.२०२६ या दिवशी मी रात्री आगवे येथून रत्नागिरी येथील आमच्या घरी आले.

७.  निधनानंतर जाणवलेली सूत्रे 

३.४.२०२६ या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता आईचे निधन झाले.

अ. ‘आईचे निधन झाले, त्या दिवशी ती काहीच बोलत नव्हती. ती दिवसभर शांत होती. तिच्या चेहर्‍यावर काही त्रास किंवा वेदना जाणवल्या नाहीत.’, असे माझ्या बहिणीने सांगितले.

आ. तिच्या निधनानंतर तिचा चेहरा पुष्कळच टवटवीत दिसत होता. ‘ती गाढ झोपली आहे’, असे सर्वांना जाणवत होते.

इ. तिच्या निधनानंतरच्या दुसर्‍या दिवशी तिचा चेहरा पुष्कळ गुलाबी दिसत होता.

ई. वातावरणात काहीच त्रास जाणवत नव्हता.

उ. २ वर्षांपूर्वी जेव्हा आई रुग्णाईत होती, तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘जेवढे दिवस जातील, तेवढे जातील’, असे सांगितले होते. तेव्हा ‘आई या जगात नसणार’, या विचारानेच माझ्या मनाची स्थिती पुष्कळच वाईट झाली होती. ही कल्पनाच मला सहन होत नव्हती; मात्र नंतर देवानेच माझ्या मनाची सिद्धता करून घेतली. ‘साधना असेल, तर आपण कोणत्याही प्रसंगात स्थिर राहू शकतो’, हे मला अनुभवायला मिळाले.’

– सौ. वैभवी विजय पाध्ये (वय ६० वर्षे), रत्नागिरी (१४.४.२०२६)