निलंबित नगररचना सहसंचालकाकडे ८२ कोटी रुपये सापडले !

पुणे – उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे अनुमाने ८२ कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांनी सासर्‍यांच्या नावावर ३७ आस्थापने स्थापन करून त्यातही आर्थिक गुंतवणूक केली आहे. (अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच इतरांवर वचक बसेल. – संपादक) न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी संमत केली आहे. हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा यांसह ८ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ जून २०२० मध्ये नाझीरकर विरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.