अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यातील रस्ते उभारणीच्या कामाचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी जंगलातून आणि चिखलातून १५७ किमी. प्रवास केला आहे. त्यांनी वाटेतील जंगल, चिखल अशा आडवळणांतून स्वतः गाडी चालवत, काही कठीण रस्त्यांवर पायी चालत प्रवास केला. हे १५७ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे २ दिवस लागले. पेमा खांडू यांचे वाहन चालवण्याचे कौशल्य किती चांगले आहे, यापेक्षा राज्यांतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि गावकरी किती कठीण प्रवास करतात, हे पहाण्यासाठी कुणा मुख्यमंत्र्याने असा प्रवास केल्याचे हे पहिलेच उदाहरण असेल. माईयो ते म्यानमारच्या सीमेजवळील विजयनगर या दरम्यान वाहनाने प्रवास करता येण्यासाठी मार्च २०२२ पर्यंत चांगला रस्ता बनवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे तो रस्ता बनवण्यासाठीच्या सर्व शासकीय अनुमतींची पूर्तता झालेली असूनही रस्ता बनलेला नसल्याने मुख्यमंत्री खांडू यांनी स्वतः प्रवास केला. हा भाग अत्यंत दुर्गम आहे. येथील गावांमध्ये एवढ्या वर्षांत प्रथमच कोणी मुख्यमंत्री पोचल्यामुळे ग्रामस्थांना आनंद झाला. त्यांनी अत्यंत उत्साहाने खांडू यांचे स्वागत केले. यातूनच हा भाग बाह्य जगतापासून किती दूर राहिला आहे, हे लक्षात येते. यातील माईयो हा भाग निसर्गसौंदर्याचे मुक्त वरदान लाभलेला आहे. त्यामुळे हा रस्ता झाला, तर माईयोमध्ये पर्यटन व्यवसायाची भरभराट होऊन तो भाग अन्य शहरांशी जोडला जाईल. व्यापार-उदिमाला प्रोत्साहन मिळेल. राज्यातील अर्थव्यवस्थेलाही एकप्रकारे चालना मिळेल. विजयनगरच्या जवळच म्यानमार आणि चीन यांच्या सीमा आहेत. तेथेही पक्का रस्ता झाला, तर पुढील काळासाठी ते उपयुक्तच ठरणार आहे.
राजकारणाला वयोमर्यादा हवी
मुख्यमंत्री खांडू यांनी यापूर्वीही नोमॅडिक जमातीच्या जनतेची भेट घेण्यासाठी राज्यातील लुगुथांग या गावी पोचण्यासाठी ११ घंटे साधारण २४ किमी पर्वतरागांतून, जंगलांतून चालत प्रवास केला होता. विशेष म्हणजे या वेळी त्यांच्यासमवेत केवळ १ सुरक्षारक्षक आणि काही ग्रामस्थ होते. सीमेवरील सैनिकांना भेटून प्रोत्साहित करण्यासाठीही खांडू यांनी पर्वतचढाई केली होती. आतापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे स्वतःच्या कपड्यांची इस्त्री मोडून जनतेला भेटण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याने प्रयत्न केले नसतील. हेच खांडू यांचे वेगळेपण आहे. आपल्याकडे पांढर्या स्वच्छ पोशाखात लाल दिव्याची गाडी घेऊन मोठा लवाजमा समवेत घेऊन फिरणारा कोणता नेता आवर्जुन दुर्गम भागात जातो ? ४१ वर्षीय खांडू हे सध्या देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राज्यातील भौगोलिक स्थिती पहाता तेथे अशाच युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. असे उत्साही, हरहुन्नरी राजकारणी आता भारतीय राजकारणात अभावानेच पहायला मिळतात. गतवर्षी पंतप्रधान मोदी यांनी ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत उत्तराखंड येथील जिम कार्बेट येथील अभयारण्यात सैर केली होती. अर्थात् तो त्यांचा व्यक्तीगत साहसदौरा होता. त्यानंतर त्या अभयारण्याला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघ राखण्यासाठी शरद पवार यांनाही पावसात भिजत सभा घ्यावी लागली होती. त्यांच्या त्या पावसातील सभेने बरेच काही साध्य झाले होते; पण निवडणुका तोंडावर नसतांना असे सगळे कोण करतात ?
राजकारणात अनुभवासमवेत वयालाही महत्त्व असायला हवे, अशी अपेक्षा करणे आता चुकीचे ठरणार नाही. सध्या आपले राजकारण पहाता सर्व काका, बाबा, आबा व्यापलेले आहेत. त्यांची शारीरिक स्थिती आणि राजकारणातील मुरब्बीपणा पहाता असे रस्त्यावर उतरून काम करण्याची खुमखुमी केवळ निवडणुकांच्या काळातच दिसून येते. अन्य वेळी बंद दरवाजाआड खलबते करणारे, सर्वत्र मोठा ताफा घेऊन उद्घाटने आणि भाषणे करणारे म्हणजे लोकप्रतिनिधी असे सध्याचे चित्र आहे. सामान्यांसाठी असे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणे, ही विदेशातील सामान्य गोष्ट असली, तरी आपल्याकडे राजकारणात अजूनही सरंजामीपणा मुरलेला आहे. नेता किंवा राजकारणी म्हटल्यानंतर कुणाच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करणारी व्यक्तीरेखा उभी रहाते ? ‘तरुण तडफदार नेता’ ही उपाधी लावावी, असे सध्या कुणी आहे का, याचा शोध घ्यावा लागेल. एका ठराविक वयानंतर स्वतः सगळीकडे फिरून लक्ष घालणे कठीण होते. अशा वेळी जसे अन्य सर्व क्षेत्रांमध्ये वयाच्या ठराविक वर्षांनंतर निवृत्ती पत्करावी लागते, तसेच प्रावधान राजकीय क्षेत्रासाठी केल्यास त्याही क्षेत्रात एक वेगळा उत्साह संचारेल.
नेता आपली भेट घेण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी येतो, यातून मतदार जोडले जातील. नेत्यांनाही समस्यांचे चांगले आकलन होईल. एरव्ही नेतेमंडळींच्या दौर्यापूर्वी जोरदार स्वच्छता केली जाते, रस्त्यातील खड्डे तात्पुरते का असेना, भरले जातात. सगळीकडे रंगरंगोटी करून परिसर चकचकीत केला जातो. साहेबांची पाठ फिरली की, पुन्हा सर्व ‘जैसे थे’ होऊन जाते. नेत्यांचे पाय जमिनीवर आले की, हा सगळा देखावा बंद होईल.
प्रकल्प का रखडतात ?
खांडू यांनी नुकताच केलेला प्रवास अनुमती मिळूनही काम चालू न झालेल्या रस्त्यासाठी होता. आता त्या कामाला गती देण्यासह एवढी वर्षे तो का रखडला, त्यामुळे बाजारभाव वाढून त्या प्रकल्पाचा खर्च किती कोटी रुपयांनी वाढला, याचाही शोध घेणे आवश्यक आहे. देशात असे किती प्रकल्प रखडलेले आहेत, याची गणतीही होणे आवश्यक आहे. ‘अनेक ठिकाणी ग्रामीण भागांतील रस्त्यांची दुःस्थिती आहे; म्हणण्यापेक्षा तेथे केवळ पायवाटाचा आहेत’, असे म्हणावे लागेल. पर्वतरांगांमधून, चिखलातून सफाईदारपणे गाडी बाहेर काढणारे पेमा खांडू हात टेकतील, अशी स्थिती देशात अनेक ठिकाणी आहे. शहरी भागांतील रस्त्यांचीही पावसाळ्यात दुरवस्था असते. कोणतेही विशेष दौरे न करताही लोकप्रतिनिधींना ती सहज लक्षात येऊ शकते; पण कोणीही निवेदन न देता, आंदोलने न करता अशा सूत्रांची दखल घ्यायची असते, याचाच आता विसर पडत चालला आहे. म्हणूनच खांडू यांचा हा आडवाटेवरचा प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आणि राजकारणाला नवा आयाम देणारा ठरणार आहे.