(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ? शीख आणि हिंदु यांच्या इतिहासामध्ये त्यांना कुणाशी संघर्ष करावा, त्यांच्यावर आतापर्यंत कुणी अत्याचार केला, हे जगजाहीर असतांना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी पाकच्या विचारांनुसार बोलत आहे का ? असा प्रश्‍न पडल्यास चुकीचे ठरू नये !

एस्.जी.पी.सी. मिटिंग

नवी देहली – सध्याचे शासनकर्ते देशाला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शीख धर्माचा इतिहास आणि सिद्धांत यात पालट करण्याचा कट रचत आहे, असा आरोप शिखांची धार्मिक संघटना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (एस्.जी.पी.सी.ने) केला आहे. भाजपचे नेते आर्.पी. सिंह यांनी एस्.जी.पी.सी.वर आरोप करतांना म्हटले होते, ‘ही संघटना शिखांचे धर्मांतर रोखण्यास अपयशी ठरली आहे.’ त्यावर एस्.जी.पी.सी.ने वरील आरोप केला. (पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शिखांचे ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात आहे, हे रोखण्यास शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने काय प्रयत्न केले, हे तिने सांगायला हवे होते; मात्र तिने ते सांगितलेले नाही. त्यामुळे तिच्यावर कुणी आरोप करत असेल, तर तो चुकीचा कसा म्हणता येईल ? – संपादक)

एस्.जी.पी.सी.चे अतिरिक्त सचिव सुखदेवसिंह भुराकोना यांनी म्हटले की, आर्.पी. सिंह अज्ञानी आहेत. त्यांनी शिखांचा इतिहास वाचलेलाच नाही. त्यांनी तो वाचला पाहिजे. जेव्हा औरंगजेब भारतातमध्ये दार-उल-इस्लाम म्हणजे ‘इस्लाममय भारत’ करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा हिंदु धर्म धोक्यात आला होता. काश्मिरी हिंदूंची हाक ऐकून श्री गुरु तेग बहादूर यांनी देहलीमध्ये हौतात्म्य पत्करले होते. (हाच इतिहास  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीनेच लक्षात ठेवायला हवा ! – संपादक) देशातील सध्याचे सरकार औरंगजेबाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. यात भेद इतकाच आहे की, औरंगजेब भारताला इस्लामी देश बनवू पहात होता, तर आताचे सत्ताधारी हिंदु राष्ट्राच्या दिशेने काम करत आहेत. (जसे हिंदु धर्मात विविध पंथ आहेत, तसाच शीख हा पंथ आहे. त्यामुळेच या पंथातील संस्कृती, आचार आणि परंपरा या हिंदूंप्रमाणेच आहेत. असे असतांना स्वतःची ही ओळख नाकारणारी शिखांची धार्मिक संस्था किती हिंदुद्वेषी आहे, हे लक्षात येते ! – संपादक) आजचे शासनकर्ते दुसर्‍या लोकांच्या धर्म, संस्कृत आणि भाषा यांना सहन करू शकत नाहीत.

नांदेड येथील संघर्षाच्या प्रकरणी अटक केलेल्या शिखांची मुक्तता करा !

नांदेड येथील श्री नांदेड साहिब गुरुद्वारामध्ये होला-मोहल्ला साजरा करतांना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस आणि शीख समाजातील समाजकंटक यांच्यात झालेल्या संघर्षाच्या प्रकरणी एस्.जी.पी.सी.च्या अध्यक्ष बीबी जागीर कौर यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी ३०० जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर अत्याचार केले गेले आहेत. (पोलिसांवर तलवारीने आक्रमण करणे, त्यांच्या गाड्या जाळणे याला काय म्हणायचे, हेही एस्.जी.पी.सी.ने स्पष्ट करावे ! – संपादक) ही कारवाई निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारने अटक केलेल्या शिखांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी केली.