साधकांवर पितृवत प्रीती करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकरकाका !

२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/464726.html


पू. अशोक पात्रीकर

८. पू. पात्रीकरकाकांची अनुभवलेली पितृवत प्रीती !

८ अ. कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील सर्व साधक नावनिशीवार आणि त्यांच्या अडचणींसह ठाऊक असणे : अमरावती जिल्ह्यात अनेक साधक आहेत; परंतु या सर्व साधकांच्या साधनेतील अडचणी पू. पात्रीकरकाकांना ठाऊक आहेत. ‘साधकांना शारीरिक वा मानसिक त्रास असो, ते त्यांना उपाय आणि मंत्र सांगून साहाय्य करतात. ‘साधकांवर गुरुकृपा व्हावी आणि ते आनंदी रहावेत’, असा त्यांचा भाव असतो. साधकांनी समष्टी कार्य करावे आणि त्यांची चांगली साधना व्हावी’, यासाठी ते सतत तत्पर असतात.’ – श्रीमती विभा चौधरी

८ आ. साधकांना त्यांची स्थिती जाणून साहाय्य करणे : ‘पू. पात्रीकरकाका हे दिसेल ते कर्तव्य, आज्ञापालन आणि प्रीती यांचे मूर्तीमंत रूप आहेत. मी पूर्णवेळ साधना करू लागलो, ते केवळ त्यांच्या प्रीतीमुळेच ! ‘साधक रुग्णाईत असतील, तर त्यांना काय हवे-नको पहाणे, वृद्ध साधकांना बाहेर जातांना चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे’, असे ते साधकांची स्थिती जाणून साहाय्य करतात. ‘साधकांची चांगली साधना व्हावी’, यासाठी ते सारखे तळमळत असतात.’ – श्री. आनंद डाऊ

८ इ. कणीक मळण्याचे यंत्र मागवणे : ‘मला कणीक मळायला त्रास होतो, हे बघून त्यांनी लगेचच जिल्हासेवकांच्या साहाय्याने कणीक मळण्याचे यंत्र मागवले. ते प्रतिदिन मला भाजी चिरून देऊन साहाय्य करतात. – श्रीमती सुलभा डाऊ

८ ई. ‘पू. काका साधकांच्या कुटुंबियांचीसुद्धा अगदी प्रेमाने विचारपूस करतात.’ – सौ. चंदा बागडे, अमरावती

८ उ. ‘पू. काकांमधील आपुलकीमुळे त्यांच्याशी बोलतांना कधीही संकोच वाटत नाही.’ – सौ. दुर्गा कडूकर

८ ऊ. वडिलांचे प्रेम आणि आधार देणे : ‘मी माझे वडील बघितले नाहीत; परंतु पू. काकांच्या रूपात देवाने मला वडील दिले. पू. काकांमध्ये प्रेमाचा ओलावा जाणवतो. मला होत असलेल्या प्रत्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमध्ये मी त्यांचा आधार अनुभवते.’ – सौ. बेला चव्हाण

८ ए. ‘साधकांच्या  सेवेचे नियोजन कसे करायला पाहिजे ?’, हेसुद्धा ते प्रेमाने समजून सांगतात.’ – सौ. संगीता ठाकूर

९. पू. काकांविषयी आलेल्या अनुभूती

९ अ. ‘एकदा पू. काका घरी आले, तेव्हा घरामध्ये चैतन्य जाणवत होते आणि चंदनाचा सुगंध येत होता.’ – सौ. चंदा बागडे

९ आ. ‘पू. काकांशी बोलल्यावर व्यष्टी साधना चांगली होते. पू. काकांच्या खोलीत निर्विचार मनाने छान जप होतो.’ – सौ. अर्चना मावळे

९ इ. ‘मी एक वर्ष पू. काकांच्या घरी भाडयाने राहिले होते. तेव्हा त्यांच्या घरात आणि वापरण्याच्या वस्तूत आम्हाला चैतन्य जाणवायचे. पू. पात्रीकरकाकांच्या घराची स्वच्छता करतांना ‘गुरुदेव माझ्याकडून आश्रमाची स्वच्छता करून घेत आहेत’, असे वाटायचे. ’ – श्रीमती रंजना विजयकर

९ ई. ‘पू. पात्रीकरकाकांच्या सान्निध्यात असतांना परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते.’ – श्रीमती विभा चौधरी

९ उ. पू. काकांच्या मार्गदर्शनातून मनातील प्रश्‍नांची उत्तरे मिळणे : ‘घरी एखादा प्रसंग घडला किंवा साधनेमध्ये काही अडचणी आल्या, मनामध्ये साधनेविषयी काही नकारात्मक विचार आले, तर मला पू. काकांची फार आठवण येते. दुसर्‍या दिवशी सत्संगाच्या माध्यमातून पू. काकांचे मार्गदर्शन मिळून मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. ही अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे. ‘त्यांच्या माध्यमातून जणू प.पू. गुरुदेव माझ्या प्रश्‍नांची उत्तरे देत आहेत’, असे मला जाणवते. कधीकधी ‘आमची व्यष्टी आणि समष्टी साधना झाली पाहिजे’, यासाठी ते आम्हाला कडक शब्दांत सांगतात.’ – सौ. लता सातोटे

९ ऊ. मानसरित्या त्रास सांगितल्यावरही त्रास न्यून होणे : ‘आधी मला संतांच्या समवेत बोलायची फार भीती वाटायची; परंतु पू. काकांचा आवाज ऐकून आपुलकी जाणवते. मला डोक्याचा फार त्रास होत होता. त्यामुळे मला काहीच सुचत नव्हते; म्हणून मी गुरुमाऊलीला हाक मारली. गुरुमाऊलीने मला पू. काकांना हाक मारायला सुचवले. मी मनातून पू. काकांना त्रास सांगितले. त्या वेळी ‘अमुक मंत्र लावा’, असे त्यांनी मला सुचवले. त्यामुळे पू. काकांना भ्रमणभाष न करताच मला चैतन्य मिळून माझा त्रास न्यून झाला.’ – सौ. रेखा अण्णाजी वाघमारे, परतवाडा

९ ए. मनात २ – ३ वेळा पू. काकांना त्रास लिहून देण्याचा विचार आल्यावरच त्रास न्यून होणे : ‘माझा शारीरिक त्रास वाढल्यास पू. काकांना तसे लिहून पाठवल्यावर त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केले की, लगेच त्रास न्यून व्हायचा. काही मासांपूर्वी २ – ३ वेळा त्रास लिहून पाठवल्यानंतर ‘उपाय येण्या अगोदरच काही प्रमाणात त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवायचे. मागील काही दिवसांपासून मला एक औषध चालू होते. त्याचा परिणाम म्हणून माझ्या शरिरातील उष्णता वाढून मला विविध उष्णतेचे विकार होऊ लागले. त्या वेळी माझ्या मनात केवळ २ – ३ वेळा ‘हा त्रास पू. काकांना लिहून देऊया’, असा विचार आला, तर ‘त्रासाचे प्रमाण पुष्कळच न्यून झाले’, असे जाणवत आहे.’ – सौ. श्रुति पाचखेडे

९ ऐ. पुण्याहून अमरावतीला जाण्यासाठी अनुमती पत्र न मिळणे, पू. पात्रीकरकाकांनी त्यासाठी कुलदेवतेचा नामजप करण्यास सुचवणे, नंतर केवळ १५ मिनिटांनी ते मिळाल्याचे कळणे : ‘जुलै २०२० मध्ये आम्हाला पुण्याहून अमरावतीला जायचे होते. कोरोनामुळे दळवळणबंदी असल्याने पोलिसांच्या अनुमतीविना जाता येत नव्हते. अनुमती पत्रासाठी प्रयत्न करूनही आम्हाला तो मिळत नव्हता; म्हणून मी तसे पू. काकांना कळवले. त्यांनी आम्हाला कुलदेवतेचा नामजप करण्यास सुचवले आणि प्रार्थनाही करण्यास सांगितले. आम्ही कुलदेवताचा नामजप करायला आरंभ केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत आम्हाला अनुमती पत्र मिळाल्याचा निरोप आला.’ – श्री. प्रदीप गर्गे

श्री गुरूंचे त्यांच्यावरी मन जडले ।

गुरुकार्याचा घेतला वसा ।
सर्वांना साहाय्य देणे वसे मनमानसा ॥ १ ॥

कर्तव्याला नाही न्यून पडले ।
म्हणून श्री गुरूंचे त्यांच्यावरी मन जडले ॥ २ ॥

प्रकृतीस नाही जपून बसले ।
आज्ञापालन सतत मनी रुजले ॥ ३ ॥

सर्व कुटुंबच असे ईश्‍वरचरणी ।
म्हणूनच लागली गुरुदरबारी वर्णी ॥ ४ ॥

किती सांगावी त्यांची महती ।
शब्दच इथे न्यून पडती ॥ ५ ॥

सहजतेने केली सर्व अडचणींवर मात ।
म्हणूनच सदैव जुळतात सहस्रो हात ॥ ६ ॥

– श्रीमती मनीषा रत्नाकर मराठे

१०. प्रार्थना

‘तुका म्हणे (संत) आले घरा । तोचि दिवाळीदसरा ।’ याप्रमाणे अमरावतीला पू. काका आहेत, तर आम्हाला सेवेसाठी बाराही मास दिवाळीच आहे. ‘ही दिवाळी अशीच राहून हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होवो’, हीच विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी प्रार्थना आहे.’ – सौ. संगीता जाधव

११. कृतज्ञता

‘पू. काका म्हणजे नम्रता, प्रेमभाव, तत्परता, आपुलकी यांचा महासागर ! संपर्कात असलेली व्यक्ती असो किंवा त्यांचे कुटुंबीय असो, सर्वांना साहाय्य करणे, हेच त्यांचे ध्येय ! ‘आदर्श साधक घडावे’ हा भाव असणारे, परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी लीन असणारे धर्मप्रचारक संत आम्हाला लाभले’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !’

– सर्व साधक, अमरावती (२४.३.२०२१)

(समाप्त)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक