सगुणाच्या साहाय्यानेच निर्गुणाचे आकलन होते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एक पोस्ट मास्तर होते. त्यांनी श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) विचारले, ‘भगवंताचे निर्गुण स्वरूप हेच खरे असेल, तर मग सगुणाची उपासना आवश्यक आहे का ?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘तुमच्या उपवर मुलीसाठी तुम्ही स्थळे पहात असता परगावच्या एका स्थळाची माहिती लागली आणि मुलाच्या वडिलांचा संपूर्ण पत्ता तुम्हाला मिळाला. तुम्ही त्या गावी जाऊन पत्त्याची चौकशी करता. तेथील एक गृहस्थ तुम्हाला सांगतो, ‘याच रस्त्याने पुढे जा. उजवीकडे वळा आणि त्या रस्त्याने गेल्यावर उजव्या हाताला पोस्टाचा खांब दिसेल, त्या खांबाच्या समोर त्यांचे घर आहे.’ हे ऐकल्यावर तुमचे सारे लक्ष त्या पोस्टाच्या खांबाकडे लागते. पोस्टाचा खांब, म्हणजे काही त्याचे घर नव्हे; पण तो खांब म्हणजे काय ? याची पूर्ण कल्पना तुम्हाला असल्याने तुम्ही चालू लागता. चालता चालता पोस्टाचा खांब दिसला की, तुम्हाला हवे ते घर मिळते. भगवंताची मूर्ती हेच काम करते. सगुणाच्या उपासनेने निर्गुण स्वरूप जाणण्याची पात्रता येते. वळलेला लाडू हे भगवंताचे सगुण स्वरूप, तर तोच लाडू फोडून पसरला, तर ते भगवंताचे निर्गुण स्वरूप समजावे.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)