साधकांवर पितृवत प्रीती करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे पू. अशोक पात्रीकरकाका !

ऑक्टोबर २०१७ पासून पू. अशोक पात्रीकर विदर्भात अध्यात्मप्रसार करत आहेत. पू. पात्रीकरकाका सर्व साधकांवर पितृवत प्रीती करतात. पू. काकांच्या आपुलकीच्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांच्याशी अगदी घरगुती अडचणी, वैयक्तिक अडचणी किंवा साधनेतील कुठल्याही प्रकारच्या अडचणींविषयी बोलतांना साधकांना संकोच वाटत नाही. पू. काकाही तेवढ्याच प्रेेमाने साधकांंच्या साधनेतील सर्व अडचणींवर उपाय सांगून त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना आधार देतात. त्यामुळे ‘पू. काकांशी बोलल्यावर आपले त्रास दूर होणारच आहेत’, अशी साधकांमध्ये ठाम श्रद्धा निर्माण झाली आहे. ‘साधकांची प्रगती व्हावी’ यासाठी ते सतत साधकांचे आढावे घेऊन त्यांना योग्य दृष्टीकोन देऊन साहाय्य करतात. पू. काका साधकांच्या कुटुंबियांचीही अगदी प्रेमाने विचारपूस त्यांच्याशी जवळीक साधतात. धर्मप्रेमींच्या मनातही पू. काकांविषयी श्रद्धा निर्माण झाली आहे.

फाल्गुन कृष्ण पक्ष व्दितीया (३०.३.२०२१) या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने विदर्भातील साधकांनी पू. काकांच्या चरणी अर्पिलेली कृतज्ञतेची भावसुमने येथे दिली आहेत.

पू. अशोक पात्रीकर

१. साधी रहाणी

‘पू. अशोक पात्रीकरकाकांचे जीवनमान अत्यंत साधे आहे. ते कुठल्याही प्रकारचा बडेजाव करत नाही. ते उपलब्ध परिस्थितीत काटकसरीने रहातात. गुरु आज्ञापालन करून सतत शिष्यभावात राहून साधना करतात.’ – श्री. हेमंत खत्री

२. सहजतेने सर्वांशी मिसळून वागणे

‘पू. काका मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखे, तर लहानांमध्ये लहानांप्रमाणे समरस होतात; म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटतात. ‘प्रेमभाव म्हणजे काय ?’, हे पू. काकांकडूनच शिकावे. त्यांचे वागणे, बोलणे आणि कृती यांत प्रेमभाव जाणवतो.’ – सौ. अर्चना अरुण रावळे

३. तीव्र बुद्धीमत्ता

‘समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मनाचे श्‍लोक आणि प.पू. गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया यांतील साधर्म्य प्रथम पू. काकांच्याच लक्षात आले.’ – सौ. मनीषा पोहनकर

४. अल्प अहं

‘मी संत आहे, तर मी साधकांना स्वतःहून कसा भ्रमणभाष करू ?’, असा विचार न करता ते साधकांना स्वतःहून भ्रमणभाष करतात.’ – श्रीमती विभा चौधरी

५. साधकांना होणार्‍या त्रासावर मंत्रजप आणि उपाय सांगून साहाय्य करणे

५ अ. मंत्रजप सांगणे : ‘पू. काका आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना मंत्रजप आणि उपाय सांगतात. पू. काकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी साधकांचा त्रास लवकर अल्प होतो.’ – श्री. हेमंत खत्री

५ आ. पू. पात्रीकरकाकांनी स्वतः संपर्क करून उपाय सांगणे : ‘दहा दिवस माझ्या नातवाचा ताप उतरत नव्हता. तपासणीचे सर्व अहवाल सामान्य होते. रात्री मी पू. काकांना संपर्क केला; पण तो झाला नाही. नंतर पू. काकांनी स्वतःहून भ्रमणभाष करून उपाय सांगितले. पू. काकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. रेखा अण्णाजी वाघमारे, परतवाडा

६. साधनेसाठी केलेले साहाय्य !

६ अ. प्रतिमा तोडून मनमोकळेपणे बोलण्यास आणि अडचणी मांडण्यास शिकवणे : ‘पू. काकांनी सर्व साधकांना ‘सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करून नियोजन कसे करावे ? गुरुकार्यात परिपूर्णता कशी असावी ? स्वतःच्या गुणांमध्ये कशी वाढ करावी ?’, हे सर्व स्वतःच्या कृतीतून शिकवले. आधी मला पू. काकांना अडचणी किंवा जिल्ह्यांची स्थिती सांगतांना प्रतिमा आड येत होती आणि आत्मविश्‍वासही नव्हता; परंतु पू. काकांनी प्रेमाने बोलून माझ्यात अंतर्मुखता निर्माण केली आणि मनमोकळेपणे बोलायला शिकवले.

६ आ. पूर्वग्रह हा स्वभावदोष जाण्यासाठी साधकांच्या सत्संगात अनेक वेळा पूर्वग्रहाची चूक मांडायला लावणे, त्यामुळे मनोलय होऊन पूर्वग्रहाची तीव्रता उणावत जाणे : आधी एका साधकाविषयी माझा मनात तीव्र पूर्वग्रह होता. त्यामुळे त्यांच्याविषयी माझी नेहमी बहिर्मुखता असायची. हे पू. काकांच्या लक्षात आले. त्यांनी अनेक स्वभावदोष सत्संगात मला तो स्वभावदोष सांगायला सांगितला. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘पू. काका किती वेळा हा स्वभावदोष सांगायला सांगतात ?’; परंतु त्यामुळे माझा मनोलय होऊन या स्वभावदोषाची तीव्रता अल्प झाली आणि त्या साधकाविषयी प्रेमभाव वाढला.’ – श्रीमती विभा चौधरी

६ इ. पू. पात्रीकरकाकांच्या प्रेमळ बोलण्याने निराशा जाऊन उत्साह वाढणे : ‘माझे साधनेचे प्रयत्न अल्प पडतात’, असे मला आढावा सत्संगात सांगितल्यावर माझ्या मनात नकारात्मक विचार वाढून मला निराशा आली; पण पू. काकांचा सत्संग आणि त्यांच्यातील प्रेमभाव यांमुळे त्यांनी सांगितलेले दृष्टीकोन माझ्या अंतर्मनात गेले. माझ्यामध्ये उत्साह निर्माण झाला. यासाठी मी पू. काकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. गिरीष कोमेरवार

६ ई. ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’, हा ग्रंथ वाचायला सांगणे : ‘पू. काकांनी आम्हाला ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ हा ग्रंथ वाचायला सांगितला. या ग्रंथ वाचनातून ‘आमच्यातही पालट व्हावा, आमचीही आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आम्ही तसे प्रयत्न करावेत, आम्हीसुद्धा पुढच्या टप्प्यात जायला हवे’, असा त्यांचा भाव आणि तीव्र तळमळ मला या प्रसंगातून अनुभवता आली.

६ उ. ‘गुरुकार्याचा चांगला प्रसार व्हावा’, अशी तळमळ निर्माण करणे : जळगाव जवळील चाळीसगाव हे गाव सनातनमय झाले आहे. त्या गावात जसेे प्रयत्न झाले, तसे प्रयत्न करण्यासाठी आणि आपले गाव सनातनमय करण्यासाठी ते प्रोत्साहन देतात. यातून ‘पू. काकांचे विचार किती व्यापक आहेत ?’, ते लक्षात आले. प्रत्येक साधक हा व्यापक झाला पाहिजे. प्रत्येक साधकाने केवळ आपलाच विचार न करता व्यापक होऊन संपूर्ण सृष्टीचा विचार करायला पाहिजे. ज्ञानेश्‍वर माऊलींच्या ‘हे विश्‍वची माझे घर ।’ या उक्तीप्रमाणे ‘आपल्यालाही या संपूर्ण सृष्टीला घर म्हणायचे आहे आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सज्ज व्हायचे आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. नरेंद्र खडसे

६ ऊ. सेवेसाठी उद्युक्त करणे : ‘प्रत्येक सोमवारी सत्संग असतो. पू. काकांनी केलेले मार्गदर्शन ऐकून आठवडाभर साधना आणि सेवा करायला सतत उत्साह जाणवतो.’ – सौ. अरुणा अ. बिंड आणि श्री. पराग  अ. बिंड

७. दुःखद प्रसंगांत साधकांना केलेले साहाय्य !

७ अ. यजमानांचे निधन झाल्यावर पुष्कळ निराशा येणे, त्या प्रसंगी एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे सांभाळून आधार देणारे पू. अशोक पात्रीकरकाका ! : ‘माझ्या यजमानांना अकस्मात् देवाज्ञा झाली. त्या वेळी पू. काकांनी मला मानसिक आणि आध्यत्मिक स्तरावर पुष्कळ सांभाळले. दोन मास माझे साधक आणि पू. काका यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे होत नव्हते. केवळ लघुसंदेशाच्या माध्यमातून पू. काका मला नामजपादी उपाय सांगायचे. मी त्यांना मला आलेल्या निराशेचे विचार सांगायचे. तेव्हा पू. काका मला नेहमी सकारात्मक होण्यास सांगायचे. पू. काकांनी केलेल्या लघुसंदेशांमुळे माझ्या मनाला आधार वाटायचा. एक वडील जसे आपल्या मुलीला सांभाळतात, तसे त्यांनी मला त्या प्रसंगात सांभाळून बाहेर काढले. ‘गुरुदेवा, आपण आम्हाला एवढे प्रेमळ धर्मप्रचारक संत दिले आणि माझ्या जीवनात या परिस्थितीतही साधनेचा विचार बिंबवलात, यासाठी कृतज्ञ आहे. पू. काका नसते, तर मी साधनेपासून वंचित राहिले असते.’ – श्रीमती विभा चौधरी

७ आ. यजमान आणि वडील यांच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे ‘स्वतःचा आधार गेला’, असे वाटून भावनिक होणे, पू. काकांनी प्रेमाने बोलून आधार दिल्यामुळे यातून बाहेर पडता येऊन आनंदी रहाता येणे : ‘दीड वर्षांपूर्वी माझ्या यजमानांना देवाज्ञा झाली. त्या वेळी मला माझा मोठा आधार गेल्यासारखा वाटले. त्यानंतर आलेले दायित्व आणि कार्यालयीन कामे यांमुळे मी पुष्कळ भावनिक अन् चिडचिडी झाले. त्यानंतर लगेचच माझ्या वडिलांनाही देवाज्ञा झाली. तेव्हा भावनाशील होऊन मला तुटून गेल्यासारखे झाले. मी पू. काकांना संपर्क करून ही सर्व परिस्थिती सांगितली. पू. काकांच्या वाणीमध्ये पुष्कळ चैतन्य होते. त्यांच्या बोलण्यातून मला माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. त्यानंतर माझी भावनिकता आणि चिडचिड न्यून झाली. मला दायित्व घेऊन सेवा स्वीकारता येऊ लागल्या. हळूहळू माझी व्यष्टी साधनाही चांगली व्हायला लागल्यामुळे मला आनंदी रहाता येऊ लागले.’ – श्रीमती रोहिणी नांदुरकर

७ इ. वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या वडीलधार्‍या व्यक्तीप्रमाणे कुटुंबियांना आधार आणि प्रेम देणे, त्यामुळे त्यातून सावरता येणे : ‘मी सातवीमध्ये असेपर्यंत आईच्या समवेत सेवा करायचो. नंतर पुढील काळात मी शिकायला बाहेर होतो. तेव्हा मी अधून मधून सेवा करायचो. माझ्या बाबांना देवाज्ञा झाली, त्या वेळी पू. काकांनी रुग्णालयापासून मला आणि आईला घरच्या सदस्याप्रमाणे पुष्कळ प्रेमाने धीर देऊन घरी आणले. आमच्या पाठीशी ते देवासारखे उभे होते. माझा पू. काकांशी फारसा संपर्क नव्हता; परंतु बाबांच्या निधनाच्या वेळी त्यांनी जो धीर दिला, तो मी कधीही विसरू शकणार नाही. आमच्या घरातील वातावरण पुष्कळ दुःखी झाले होते. पू. काका सतत आमच्या समवेत असायचे. त्यांच्या बोलण्यामुळे मला ‘बाबा आमच्या समवेत आहेत’, असे वाटायचे. आज आम्ही पू. काकांमुळे आनंद अनुभवतो आहे. त्यामुळे मला पू. काका आणि सनातन संस्था पुष्कळ जवळची वाटायला लागली अन् मी सेवाही करायला लागलो.’ – श्री. महेश चौधरी

७ ई. पू. पात्रीकरकाकांनी दिलेला आधार आणि प्रीती यामुळे दुःखद प्रसंगातून बाहेर पडता येणे : ‘माझ्या यजमानांचे निधन झाल्यावर मी खचून गेले होते. पू. पात्रीकरकाका घरी भेटायला आल्यावर ‘काकांच्या माध्यमातून गुरुदेवच आले’, असे मला जाणवले आणि मला शक्ती मिळाली. पू. काकांनी प्रेमाने धीर देऊन त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे निरपेक्ष प्रेम आणि साधना यांच्या बळावर मी यातून बाहेर पडले.’ – श्रीमती विशाखा अभ्यंकर

(क्रमशः)

उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/465048.html

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक