विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून  दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – विहिंप-बजरंग दल यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

प्रांताधिकारी डॉ. विकास खरात (डावीकडे) यांना निवेदन देतांना विहिंप आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते 

 इचलकरंजी (कोल्हापूर), ३१ मार्च (वार्ता.) – विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. अहिल्याबाई भोसले यांची समाधीही दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी ‘पेव्हर ब्लॉक’चा रस्ता आहे, तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून; दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करावा, या मागणीसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना ३० मार्च या दिवशी निवेदन दिले.

या वेळी शहरमंत्री श्री. प्रवीण सामंत, बजरंग दल संयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री पंढरीनाथ ठाणेकर, रणजित पवार, सचिन जनवाडे, बाळासाहेब ओझा, गौरव ठोंबरे, अनिल साळुंखे, अभिषेक देसाई, निखिलराजे आवळे यांसह विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.