राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्यपदक घोषित

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण (निर्मूलन) कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रभावी उपाययोजना राबवल्याविषयी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्यपदक आणि २ लाख रुपये पारितोषिक घोषित झाले आहे. जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वर्ष २०१५ नंतर २० टक्के घट झाल्यामुळे या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसह देशातून ७२ जिल्हे नामांकित झाले होते. केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इपिडेमॉलॉजी, चेन्नई’ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध निकषांच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पडताळणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.