सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु स्वातीताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !
२८ मार्च २०२१ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मागील २ वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील आणि गोवा राज्यातील सर्व साधकांना सद्गुरु स्वातीताईंचा ‘विष्णुलीला सत्संग’ मिळत आहे आणि ते सर्वजण ही विष्णुलीला अखंड अनुभवत आहेत.
या सत्संगामध्ये साधकांना पुढील सत्संगापर्यंतचे ध्येय घेण्यास सांगितले जाते, उदा. संस्कार-वहीची मागणी घेणे आणि वितरणासाठी प्रयत्न किंवा एखाद्या नवीन आलेल्या ग्रंथाची, उदा. आपत्कालीन ग्रंथ संचाची वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, तसेच नातेवाईक यांच्याकडून मागणी घेणे. सर्व साधक वैयक्तिक ध्येय घेऊन त्या दिशेने प्रयत्न करतात. सद्गुरु स्वातीताई ‘साधना भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, याचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे ‘समष्टी सेवेत देवाचे साहाय्य मिळते’, असे सर्व साधक अनुभवत आहेत. परात्पर गुरुदेवांची कृपा, सद्गुरु स्वातीताईंचा संकल्प आणि समष्टी सत्संगातील सर्वांची सकारात्मकता, यांमुळे सत्संगात घेतलेल्या प्रत्येक सूत्राला भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. बर्याच मोहिमांमध्ये ‘न भूतो न भविष्यति ।’ अशी फलनिष्पत्ती सर्वांना अनुभवायला मिळाली. गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अधिवेशन आदी महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी अर्पणाच्या दृष्टीने प्रयत्न करणे, या उपक्रमांचे निमंत्रण पोचवणे, असे विषयही सत्संगांमध्ये घेतले जातात. त्यामुळे विहंगम प्रसारासाठी दिशा लाभते.
मार्च २०२० पासून चालू झालेल्या दळणवळण बंदीच्या काळातही हा सत्संग अखंड चालू होता. त्यामुळे ऑनलाईन चालू असलेले सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग यांचा प्रसार करणे, साधकांचे नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित उद्योजक अन् युवा साधक यांच्यासाठी विविध शिबिरे ठरवणे, शौर्यजागृती व्याख्याने, प्रथमोपचार शिबिर इत्यादींचे आयोजन, प्रसार, तसेच या शिबिरांतून संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना जोडून ठेवणे, यांविषयीचे प्रयत्नसुद्धा साधक सत्संगांत सांगतात. त्यामुळे ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग, शिबिरे, तसेच सत्संग यांची घडी चांगल्या रीतीने बसून ते सर्व जीव गुरुकार्याशी जोडले गेले आहेत.
‘हा ‘विष्णुलीला सत्संग’ आध्यात्मिक स्तरावरच होतो’, याची प्रत्येक आठवड्याला अनुभूती येते. सत्संग चालू असतांना काही साधकांना घरात प्रकाश वाढल्याचे जाणवते, कधी दैवी सुगंध येतो, तर कधी ‘हा सत्संग विष्णुलोकातच चालू आहे’, असे जाणवते. या सत्संगामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुणे जिल्ह्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे गुरुचरणी अर्पण करते.’ – सौ. मनीषा पाठक, पुणे
२५ मार्च या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज अंतीम भाग पाहूया.
२५ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखातील सूत्रे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/462176.html
१. ‘विष्णुलीला सत्संगा’मुळे साधकांचे समष्टी साधनेचे झालेले विहंगम प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती
१ ई. सत्संगामुळे साधनेच्या प्रयत्नांना गती मिळणे : ‘सत्संगात पंचांगांच्या विज्ञापनांचा विषय झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हा साधकांकडून प्रयत्न झाले. तेव्हा २ – ३ दिवसांतच विज्ञापने मिळाली. गुरुदेवांच्या कृपेने साक्षात् सद्गुरूंचा सत्संग नियमित लाभून आम्हाला गुरुसेवेची दिशा मिळते आणि साधनेच्या प्रयत्नांना गती मिळते. यासाठी गुरुदेवांच्या आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
१ ई १. सत्संगात सांगितलेल्या प्रत्येक सूत्रावर तत्परतेने कृती करणार्या श्रीमती माधवी गोरे ! : श्रीमती माधवी गोरेकाकू या साधिकेचे वय ६९ वर्षे आहे. वयोमान आणि शारीरिक त्रास यांमुळे त्यांना बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी त्या ‘घरात बसून कोणती सेवा करू शकते’, असा विचार सतत करतात. सत्संगात सांगितलेल्या प्रत्येक सूत्रावर त्या तत्परतेने कृती करतात. केंद्रात ऑनलाईन प्रवचने ठरवणे, प्रवचने घेणे, भ्रमणभाषवरून अर्पण घेणे, वह्यांची मागणी घेणे, पंचांग मागणी घेणे, मकरसंक्रांतीच्या निमित वाणासाठी मागणी घेणे, या सेवा त्यांनी केल्या.’
– सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे, सातारा रस्ता
१ उ. हडपसर येथे प्रथमच २५० आकाशकंदिलांची मागणी मिळणे : ‘वर्ष २०१९ मध्ये हडपसर येथे पहिली सभा झाली. त्या वेळी दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदिलांची मागणी घ्यायला सांगितली होती. ‘कंदिलाचे महत्त्व, होणारे लाभ आणि त्यातून ‘साधकांची साधना कशी होणार आहे ?’, याविषयी सत्संगात सांगितले होते. सद्गुरु ताईंच्या संकल्पाने आणि साधकांच्या प्रयत्नांनी प्रायोजक मिळाले. सर्व साधकांनी सांघिक भावाने आकाशकंदील बनवून ते समाजात वितरण केले.
१ उ १. संस्कार वह्यांची मागणी घेण्यासाठी साधकांनी सांघिक भावाने प्रयत्न करणे : काही दिवसांपूर्वी ‘संस्कार वही’ वितरणाच्या दृष्टीने सत्संगात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. तेव्हा साधकांनी सांघिक भावाने ध्येय घेऊन सनातन वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न केले. ‘सत्संगाच्या माध्यमातून साधकांची तळमळ आणि गांभीर्य वाढून त्यांचे प्रयत्न वाढले’, असे लक्षात आले.’
– सौ. रीमा नान्नीकर आणि सौ. छाया राऊत, हडपसर
१ ऊ. समष्टी सेवेत येणारे अडथळे दूर करून तळमळीने समष्टी सेवा करणार्या सौ. अस्मिता आवटी ! : ‘सत्संगामुळे या क्षुद्र जिवाला साक्षात् श्रीमन्नारायण विष्णुस्वरूप कृपाळू गुरुमाऊलींचे अस्तित्व अनुभवण्याची संधी मिळते. गुरुमाऊलींच्या कृपेने अन् सद्गुरु ताईंच्या संकल्पाने साधनेला होणारा विरोध आणि आध्यात्मिक त्रास यांवर मात करून प्रयत्न करता येतात. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकासाठी विज्ञापने मिळाली. सद्गुरु ताईंच्या संकल्पामुळे वह्या, तसेच ग्रंथ वितरणासाठीही चांगले प्रयत्न करता आले. अशा प्रकारे सत्संगामुळे ही सेवा करता येत आहे आणि त्यातील आनंदही घेता येत आहे.’ – सौ. अस्मिता आवटी, सिंहगड रस्ता
१ ए. विष्णुलीला सत्संगाची ‘यू ट्यूब स्ट्रीमिंग’ची सेवा करतांना तांत्रिक अडथळे येऊनही सद्गुरु स्वातीताईंच्या चैतन्यामुळे आणि त्यांच्या अस्तित्वामुळे येणारी अनुभूती : ‘मला काही वेळा विष्णुलीला सत्संगाच्या ‘यू ट्यूब स्ट्रीमिंग’ची (सत्संगाचे ‘यू ट्यूब’द्वारे थेट प्रसारणाची) सेवा करता आली. त्या वेळी बर्याच वेळा तांत्रिक अडथळे येतात; पण ‘सद्गुरु स्वातीताईंच्या चैतन्याने सत्संग निर्विघ्नपणे पार पडतो’, असे मला पुष्कळ वेळा जाणवले आहे. एकदा एका सत्संगाची ही सेवा करतांना मी ‘इंटरनेटचा स्पीड’ तपासला असता ‘अपलोड स्पीड शून्य एम्बीपीएस्’ झाला होता. ‘मी ‘इंटरनेट’ चालू आहे का ?’, हे तपासण्यासाठी ‘गूगल’वर काही संकेतस्थळे उघडतात का ?’, हे बघितले. तेव्हा ‘ब्राऊजर’ने मला ‘इंटरनेट’ नसल्याचे दाखवले. आता साहजिकच ‘यू ट्यूब स्ट्रीमिंग’ थांबणार’, अशी स्थिती होती; पण असे न होता सत्संग चालू असणारे ‘यू ट्यूब’चे केवळ एकमेव ‘वेब पेज’ चालू होते. हे बघून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. केवळ सद्गुरु ताईंच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या चैतन्याने ही अनुभूती आली आणि अनेक साधकांना हा चैतन्यदायी सत्संग ऐकता आला. मला श्रीविष्णूची लीला अनुभवता आली.’ – कु. स्नेहल गुब्याड, सिंहगड रस्ता
२. सत्संगातून साधकांना साधनेची आणि गुरुसेवेची दिशा मिळाल्याने दळणवळण बंदीच्या काळातही विविध सेवा समयमर्यादेत अन् फलनिष्पत्तीकारक होणे
‘सद्गुरु स्वातीताईंच्या चैतन्यमय वाणीतून मिळणार्या सत्संगाविषयी साधकांना कृतज्ञता वाटते. ‘सद्गुरु स्वातीताई प्रयत्नांची दिशा देत असल्याने ताईंचा संकल्प कार्यरत होतो आणि सेवेचे प्रयत्न करतांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो’, असे अनुभवायला आले आहे. दळणवळण बंदीच्या काळात साधकांना प्रसाराला बाहेर पडता येत नव्हते, तरीही सत्संग ऐकून साधकांनी पंचांग, वही वितरण, आकाशकंदिलाची मागणी, अक्षय्यतृतीया आणि गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन अर्पण घेणे, ग्रंथांसाठी मागणी घेणे आदींसाठी साधकांनी तळमळीने प्रयत्न केले. सद्गुरु ताईंच्या संकल्पाने या सर्व सेवा समयमर्यादेमध्ये आणि फलनिष्पत्तीकारक झाल्या. एवढा आपत्काळ असूनही सद्गुरु ताईंच्या आणि गुरुदेवांच्या कृपेनेच सर्व सेवा होत आहेत, ‘आपण केवळ आज्ञापालन करायचे’, असा भाव साधकांमध्ये निर्माण झाला.’ – सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे, सातारा रस्ता
३. प्रासंगिक सेवा करणारे साधक, तसेच साधकांचे नातेवाईक सेवेत सहभागी होणे
‘केंद्रातील काही साधक पूर्वी वर्षातून एकदा किंवा ६ मासांतून एकदा सेवेत सहभागी होत असत. सत्संग मिळाल्याने त्यातून प्रेरणा घेऊन अनेक साधकांचा विविध सेवांमध्ये सहभाग, तसेच पुढाकार घेऊन सेवा करण्याचा भाग वाढला. ‘सोशल मिडिया’ सेवा, संगणकीय सेवा, प्रवचन घेणे, आदी सेवा साधक दायित्व घेऊन करत आहेत. साधकांच्या काही नातेवाइकांनी व्यष्टी साधना करायला आरंभ केला आहे, तसेच ते समष्टी सेवा करू लागले आहेत.’ – सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे, सातारा रस्ता आणि सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड
‘खरेतर विष्णुलीला सत्संगातून सर्वदूर विहंगम प्रसार झाला असून श्री गुरूंची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. याविषयी शब्दांमध्ये काही व्यक्त करणे या अज्ञानी जिवाला शक्य नाही. तरी या सत्संगातील महिमा गुरुचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न गुरुदेवांनी करवून घेतला, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
गुरुचरणी,
– सौ. मनीषा पाठक, पुणे (२१.२.२०२१)
(समाप्त)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |