पुणे शहरापेक्षा पुणे ग्रामीणमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे अधिक असल्याचा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’चा अहवाल

महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, २२ मार्च – राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्या अहवालानुसार राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात प्रत्येक वर्षी वाढ होत असून बलात्कार, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी यांच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये पुणे शहरापेक्षा पुणे ग्रामीणच्या हद्दीत महिला अत्याचाराचे गुन्हे अधिक घडल्याचे दिसून आले आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत एकीकडे वाढ होत असतांना या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र पुष्कळ अल्प आहे.

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा विभागानुसार विचार केल्यास सर्वाधिक १७.५७ टक्के गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. त्यानंतर ठाणे ४.७२, नगर ४.५०, पुणे ग्रामीण ३.८५, पुणे शहर ३.७५, नागपूर ३.८ टक्के गुन्हे घडले आहेत. महिला अत्याचाराच्या एकूण गुन्ह्यांत सर्वाधिक गुन्हे विनयभंगाचे आहेत. विनयभंगासमवेत छेडछाडीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. छेडछाडीचे निम्मे गुन्हे मुंबई शहरात नोंद झाले आहेत.

राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे. सध्या राज्यातील विविध न्यायालयांत ९३ टक्के महिला अत्याचाराचे गुन्हे प्रलंबित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या आकडेवारीतून लक्षात येते. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक)