बेळगाव येथे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मराठी भाषेचे स्टेटस ठेवणार्‍या ४ तरुणांना कर्नाटक पोलिसांकडून अमानुष मारहाण

कर्नाटक पोलिसांचा मराठीद्वेष !

बेळगाव, १५ मार्च – येथील मच्छे गावातील ४ तरुणांनी त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या स्टेटसवर ‘मराठी भाषिक वाघ आहे’, असे स्टेटस ठेवले होते. या कारणावरून कर्नाटक पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. पाठ, हात आणि पाय यांवर पट्टा अन् काठी यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे तरुणांच्या शरिरावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्‍न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला. कोल्हापूर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी एका व्हिडिओद्वारे व्यावसायिकांना चेतावणी दिली की, यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात कन्नडचा एकही फलक दिसला, तर शिवसेनेच्या पद्धतीने त्यावर कारवाई करण्यात येईल.