‘२२.३.२०२० पासून भारतभर दळणवळण बंदी चालू झाली. ती अजूनही अल्पाधिक प्रमाणात चालूच आहे. दळणवळण बंदी लागू झाल्यापासून खर्या अर्थाने आपत्काळाची थोडीफार झळ सर्वसामान्यांना पोचू लागली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगामध्ये सांगितले होते, ‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील चव्हाण, निंबाळकर आणि लोकरे या साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली प्रचीती येथे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. चव्हाण कुटुंबियांना आलेल्या अनुभूती
१ अ. एरव्ही आई-बाबा कोल्हापूर येथे एकटे रहात असणे; मात्र दळणवळण बंदीच्या काळात मोठी बहीण आणि मेहुणे यांनी त्यांच्याकडे रहायला जाणे : मी, माझे पती श्री. सागर निंबाळकर, माझी बहीण कु. मेघा चव्हाण, भाऊ श्री. महेश चव्हाण, वहिनी सौ. स्नेहल आम्ही सर्वजण रामनाथी आश्रमात रहातो. माझी मोठी बहीण सौ. मीनाक्षी हर्षे दळणवळण बंदीच्या काळात सेवेनिमित्त बेंगळुरू येथे रहात होती. तिचे पती श्री. धनंजय हर्षे हेही रामनाथी आश्रमात राहून सेवा करत होते. त्यामुळे दळणवळण बंदीच्या काळात आई सौ. अंजना चव्हाण आणि बाबा डॉ. निवृत्ती चव्हाण हे दोघेच घरी होते. या काळात त्या दोघांचीही प्रकृती उत्तम होती.
मे मासाच्या दुसर्या आठवड्यात आंब्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने श्री. हर्षे कोल्हापूर येथे गेले. त्यानंतर काही दिवसांनी सौ. मीनाक्षीही बेंगळुरूहून कोल्हापूरला आईकडे आली. त्या दोघांची कामे संपल्यानंतर जून मासात ते पुन्हा आपापल्या सेवेनिमित्त बाहेरगावी जाणार होते; मात्र खासगी वाहनांचे दर वाढले, चालक मिळाला नाही, या आणि अन्य काही कारणामुळे त्यांनी बाहेरगावी जाणे पुढे ढकलले.
१ आ. आईला झालेला शारीरिक त्रास आणि तिचे आजारपण : जून मासात आईचा रक्तदाब वाढला. तेव्हा तिला नेहमी औषधे देणार्या आधुनिक वैद्यांचे रुग्णालय बंद होते. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. परिणामी नवीन आधुनिक वैद्यांकडे औषधोपचार, चाचण्या इत्यादी कराव्या लागल्या. हा रक्तदाब नियमित (नॉर्मल) होण्यासाठी २-३ आठवड्यांचा कालावधी लागला. त्यानंतर जुलै मासामध्ये आईला ताप येऊ लागला. आधुनिक वैद्यांच्या औषधांनी ताप न्यून होत नव्हता. ती नामजपादी उपाय करत होती. नेहमी आईला ताप आल्यावरही ती उठून स्वयंपाक करायची. या वेळी मात्र ती अंथरूणातून उठू शकली नाही. तिचा ताप उतरण्यासाठी ४-५ दिवस लागले.
१ आ १. साधक आधुनिक वैद्यांनी सहकार्य केल्याने आणि नामजपादी उपाय केल्याने आईचा ताप उतरणे : या कालावधीत ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढतच असल्याने अन्य आधुनिक वैद्यांच्या रुग्णालयात आईला नेणे धोक्याचे वाटत होते. या कालावधीत सनातनचे आधुनिक वैद्य साधक डॉ. मानसिंग शिंदे आणि डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी आईला औषधे दिली. ‘लॅब’मधून आवश्यक त्या सर्व तपासण्या करून घेतल्या. त्या सर्व तपासण्या देवाच्या कृपेने सामान्य (नॉर्मल) आल्या. त्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आईचा ताप उतरला; मात्र तिच्या पायाला अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत ‘स्कीन इन्फेक्शन’ झाले.(त्वचा संसर्ग झाला.) त्यामुळे तिला ७ -८ दिवस चालता येत नव्हते. तिला चालतांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. ते ‘इन्फेक्शन’ औषधोपचारांनी बरे झाले; मात्र तरीही आणखी काही दिवस तिला नीट चालता येत नव्हते.
१ इ. सौ. मीनाक्षीताईही आजारी पडणे आणि जावई असूनही श्री. धनंजय यांनी स्वयंपाक अन् घरातील कामे केल्याने आपत्काळात कुटुंबाला मोलाचे साहाय्य मिळणे : आईला बरे वाटायला प्रारंभ होत असतांनाच सौ. मीनाक्षीताईलाही ताप आला. त्या वेळी आईलाही चालता येत नव्हते. तेव्हा श्री. धनंजय हर्षे यांनी बाबांच्या साहाय्याने ४ दिवस भात-आमटी, खिचडी, अल्पाहार इत्यादी केले. श्री. धनंजय घरातील इतर सर्व कामेही करत होते. त्यांनी सौ. मीनाक्षी आणि आई यांना आजारपणात साहाय्य केले. या कालावधीत जावई असूनही साधकाप्रमाणे वागणार्या धनंजय यांचे मोलाचे साहाय्य कुटुंबियांना झाले. त्यांनी पत्नी अन् सासू-सासर्यांच्या सेवेचे कर्तव्य चोख निभावले.
१ ई. सौ. मीनाक्षीताईला सांधेदुखीचा त्रास उद्भवणे : या कालावधीत सौ. मीनाक्षीताईचा ताप उतरला; मात्र नंतर तिला अंगदुखी आणि सांधेदुखी यांचा त्रास होऊ लागला. पहिले ८-१० दिवस थोडीफार हालचाल करता येत होती. पण त्यानंतर सांधेदुखीची तीव्रता अधिक वाढल्यामुळे तिला चालणे किंवा हालचाल करणे कठीण झाले. त्यामुळे वैद्यांना विचारून आयुर्वेदिक उपचार आणि नामजपादी उपाय चालू केले. त्यानंतर सौ. मीनाक्षीताईला ३ आठवड्यांनी काही प्रमाणात बोटे हलू लागणे, जेवण आणि अल्पाहार घेण्यासाठी स्वयंपाकघरात चालत येणे जमू लागले.
पाठोपाठ येणार्या अडचणी आणि त्रास यांना तोंड देणे हे केवळ गुरूंची कृपा असल्यानेच आम्हाला शक्य झाले. केवळ देवाच्या नियोजनामुळेच एवढ्या अडचणी येऊनही सर्व प्रारब्ध सुसह्य झाले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. श्रद्धा सागर निंबाळकर (चव्हाण कुटुंबियांची द्वितीय कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०२०)
२. निंबाळकर आणि लोकरे कुटुंबियांना आलेल्या अनुभूती
२ अ. भाडेकरू घर सोडून गेल्याने ‘कोरोना’चा संभाव्य धोका टळणे : कोल्हापूर येथील माझ्या घरी माझी आई सौ. विजया (वय ६६ वर्षे) आणि बाबा श्री. बाळासाहेब निंबाळकर (वय ७१ वर्षे) रहातात. आमच्या घराच्या मागे असलेल्या दोन खोल्यांमध्ये भाडेकरू म्हणून एक कुटुंब रहायचे. कुटुंबाचा मालक ओझेवाला (हमाल) होता. त्याचा प्रतिदिन अनेक लोकांशी संपर्क येत असे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे कुटुंब अचानक घर सोडून गेले. त्यामुळे भाडेकरूंशी पाणी देण्याच्या निमित्ताने आणि अन्य कारणांनी येणारा आई-बाबांचा संभाव्य संपर्क टळला. यामुळे ‘एक प्रकारे ‘कोरोना’चा धोका दूर झाला’, असे लक्षात येऊन याविषयी आई-बाबांनाही कृतज्ञता वाटली.
२ आ. व्यष्टी आढाव्यांमुळे आईच्या आनंदात वाढ होणे : दळणवळण बंदी चालू झाल्यावर आईचा स्थानिक साधकांसमवेत दैनंदिन व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाला. त्यामुळे तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढून तिच्या आनंदात वाढ झाली. दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’, ‘महाभारत’, श्रीकृष्णा’ या शृंखला पहातांना तिची सतत भावजागृती होत होती. तिचे दूरचित्रवाणीवरील अन्य कार्यक्रम पहाणे पूर्णतः बंद झाले. आता ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न अधिकाधिक कसे करता येतील ? स्वभावदोषांच्या सूचना कशा सिद्ध करू ? प्रार्थना कशी करू ?’, असेच प्रश्न ती आम्हाला विचारते. प्रयत्न कसे करायचे, हे सांगितल्यानंतर ती स्वतः प्रयत्न करते. आढाव्यातही सांगते. त्या प्रयत्नांचा लाभ आढाव्यातील साधकांनाही होत असल्याचे ती आम्हाला सांगते.
२ इ. श्री. निंबाळकर यांना आलेल्या अनुभूती
२ इ १. बाबांना वयाच्या ७१ व्या वर्षी नोकरी लागणे : बाबांचे शिक्षण नसल्याने त्यांनी आजवर कधी कुठे नोकरी केली नाही; मात्र गल्लीतीलच एका व्यक्तीने त्यांची एका सुरक्षा आस्थापनामध्ये (‘सिक्युरिटी एजन्सी’मध्ये) ओळख करून दिली. हे आस्थापन अनेक शासकीय कार्यालये आणि अन्य कार्यालये यांना सुरक्षारक्षक पुरवते. त्या व्यक्तीच्या ओळखीमुळे फेब्रुवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात वयाच्या ७१ व्या वर्षी बाबा या ठिकाणी नोकरीला लागले.
२ इ २. बाबांनी बसून नामजप करणे चालू करणे : त्या सुरक्षा आस्थापनाने बाबांना घरापासून चालत १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका बाजार समितीच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी ठेवले होते. या ठिकाणी त्यांना केवळ बसून देखरेख करणे, एवढेच दायित्व होते. एरव्ही बाबांना वारंवार ‘बसून नामजप करा’, असे सांगावे लागायचे; मात्र या ठिकाणी बसण्याच्या कालावधीत बाबा आपोआप नामजपही करू लागले.
२ इ ३. दळणवळण बंदीच्या काळात अन्यांकडे पैसे संपत आलेले असतांना बाबांना दीडपट वेतन मिळणे : दळणवळण बंदी असली, तरी कार्यालयांची सुरक्षा आवश्यक असल्याने येथे सुरक्षारक्षकांना सुटी दिली नव्हती; परंतु ‘कोरोना’च्या संसर्गामुळे या सुरक्षा आस्थापनातील बाहेरील राज्यांतील आणि शहरांतील अनेक कर्मचारी त्यांच्या घरी निघून गेले. त्यामुळे बाबांना मात्र सलग १२ ते १६ घंटेही सेवा मिळाली. त्यामुळे सलग तीन मास दीडपट वेतन मिळाले.
समाजातील अन्य लोकांकडे दळणवळण बंदीमुळे पैशांची वानवा होती. अनेकांना चाकरी, व्यवसाय आदी बंद असल्याने वेतन मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन बाबांना मिळत असलेल्या वेतनाविषयी बाबा वारंवार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायचे. ही सर्व गुरूंचीच कृपा आहे’, असे ते श्रद्धापूर्वक सांगू लागले. त्यांच्या प्रत्येक भ्रमणभाषवरील बोलण्यात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञतेचेच शब्द असतात. या वयातही ते आनंदाने अन् उत्साहाने चाकरीसाठी जातात. या आपत्काळात ते सदैव कृतज्ञताकाळात राहिले.
२ इ ४. गणेशोत्सवातही श्री गणेशाची मूर्ती घरपोच झाल्याने श्री गणेशपूजा आणि कुलाचार व्यवस्थित पार पडणे : दळणवळण बंदीच्या काळातच गणेशोत्सव आला. त्याआधी महिनाभर माझ्या बाबांना काळजी वाटत होती की, ‘या वर्षी श्रीगणेशमूर्ती कशी आणायची ? कुठून आणायची ? तिचे सर्व व्यवस्थित करता येईल ना ?’ त्यांची ही काळजीही देवाने मिटवली. कोल्हापूर येथील सनातनचे साधक श्री. विलास वेसणेकर यांनी सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या. मूर्ती कोल्हापुरात आल्यानंतर आमच्या शेजारचे साधक श्री. दिगंबर जाधवकाका यांनी ती मूर्ती त्यांच्या वाहनातून त्यांच्या घरी आणून ठेवली. त्यामुळे बाबांची सर्व चिंता मिटवून साक्षात् श्री गणेशच आमच्या घरी आला. कुलाचार व्यवस्थित पार पडले, याविषयीही बाबांना कृतज्ञता वाटते.
२ ई. बहिणीला लोकसर्वेक्षणाचे कार्य करतांना श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यामुळे आलेल्या अनुभूती : माझी बहीण सौ. मधुरा सुहास लोकरे हीसुद्धा उंचगाव, कोल्हापूर येथेच माझ्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर रहाते. तीही नामजप, उपाय, अर्पण इत्यादी करते. ती अंगणवाडी-सेविका आहे. त्यामुळे तिला ‘कोरोना’शी संबंधित लोकसर्वेक्षणाच्या निमित्ताने अनेकदा अंगणवाडी असलेल्या भागात जावे लागायचे. तिचे अनेक घरांत जाणे व्हायचे; मात्र ती सर्व नियमांचे पालन करायची. ती सतत अत्तर आणि कापूर यांचे उपाय करत असे. लोकांशी बोलतांना ती मनातल्या मनात श्रीकृष्णाला प्रार्थना करत असे, ‘हे श्रीकृष्णा, या लोकांच्या माध्यमातून तूच माझ्याशी बोल.’ सौ. मधुराची शरीरयष्टी बारीक आहे आणि प्रकृती नाजूक आहे; मात्र कामाच्या वेळी सतत कृष्णाच्या अनुसंधानात रहाण्याचा तिने प्रयत्न केला. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कालावधीत तिची प्रकृती उत्तम राहिली. त्यासोबतच तिचे गेले ३ मास न झालेले वेतन दळणवळण बंदीच्या काळात एकदम जमा झाले.
२ उ. भाऊजी श्री. सुहास लोकरे यांना आलेल्या अनुभूती : माझे भाऊजी श्री. सुहास लोकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकोषात (बँकेत) चाकरी करतात. हा अधिकोष दळणवळण बंदीच्या काळातही चालू होता. तेथे श्री. लोकरे यांना प्रतिदिन जावे लागत असे. श्री. लोकरे रा.स्व. संघातील एका विभागाचे समन्वयक म्हणूनही दायित्व पहातात. ‘कोरोना’च्या संदर्भात अलगीकरण केलेल्या लोकांना चहा-पाणी देणे, त्यांना आवश्यक ते साहित्य पुरवणे, सर्वसामान्य लोकांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्या काढ्याचे साहित्य उपलब्ध करून देणे, ‘आर्सेनिक आल्ब’च्या गोळ्या वाटणे यांसारखी संघकार्येही ते करत होते. हे सगळे करतांना त्यांना ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी नामजप करण्यास सांगितला होता. तो ते करत असत. त्यामुळेच ‘त्यांचे ‘कोरोना’पासून रक्षण होऊ शकले’, असे वाटते. ऑगस्टमध्ये श्री. लोकरे यांना ४ दिवस ताप आला होता; तेव्हा त्यांच्या घरी भ्रमणभाषवर तापावरील मंत्रजप लावणे, नामजप लावणे इत्यादी उपाय सर्वांनी मिळून केले. या वेळी श्री. लोकरे यांच्या केलेल्या तपासणीचे सर्व अहवाल सर्वसाधारण आले. त्यामुळे श्री. लोकरे यांच्या कुटुंबियांनीही परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
२ ऊ. भाचा कु. अथर्व लोकरे याच्यात झालेला पालट : माझा भाचा कु. अथर्व लोकरे हा या कालावधीत घरी राहून कंटाळला होता; मात्र त्याला श्री गणेशाची ११ नावे, मारुतिस्तोत्र आदी पाठ करायला सांगितल्यावर त्याने ते न कंटाळता केले. त्याने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित ‘ऑनलाईन संस्कारवर्ग’ही ऐकले. त्याप्रमाणे तो सारणीलिखाण, नामजप इत्यादी कृती करण्याचा प्रयत्न केला. तो घरची कामे मन लावून आणि सेवा म्हणून करू लागला. त्याचा आईचे ऐकण्याचा भागही वाढला. त्याच्यात सकारात्मक पालट झाला.
२ ए. कृतज्ञता ! : गुरुदेव, माझ्या ४ कुटुंबियांपैकी ३ जण सतत लोकांच्या संपर्कात असूनही तुम्हीच त्यांचे ‘कोरोना’ महामारीपासून रक्षण केलेत. तुम्हीच त्यांचे आरोग्य चांगले राखलेत. त्यांना कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळही तुम्हीच दिलेत. यासाठी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.
३. साधक उद्धरले श्री गुरुकृपेने !
हे गुरुदेवा, ‘सर्वसामान्यांसाठी असलेल्या आपत्काळात वरील सर्व कुटुंबियांना ‘कृतज्ञताकाळा’ची अनुभूती तुम्हीच आम्हाला दिलीत. वर दिलेल्या सर्व अनुभूती प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत, असेच म्हणता येईल. या प्रकारच्या शेकडो अनुभूती केवळ माझ्या कुटुंबियांना नाही, तर सर्वत्रचे सनातनचे साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांना आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांच्या लेखात भजनांच्या पुढील ओळी प्रसिद्ध झाल्या होत्या.
‘श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी । ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उद्धरलो गुरुकृपे ॥’
या ओळींची प्रचीती सर्वत्रचे साधक घेत आहेत, याविषयी पुन्हा श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |