पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरातील शिवशक्ती यागाची आज सांगता

शिवशक्ती यागाच्या दुसर्‍या दिवशी मंत्रघोष करतांना ब्रह्मवृंद

पिंगुळी – प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.

११ मार्च या यागाच्या दुसर्‍या दिवशी पहाटे काकड आरती, सकाळी ७ वाजल्यापासून प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी पूजन, अभिषेक, ‘शिवकवच’ महामंत्राचा जपाभिषेक,

१ सहस्र १०८ शिवसहस्रनाम बिल्वदल शिव महापूजा, देवीसूक्त आणि शिवकवच महामंत्र हवन, आरती, मंत्रपुष्पांजली झाली. दुपारी श्रींची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी सांजआरती आणि पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. १२ मार्चला विविध धार्मिक विधींसह शिवकवच हवन, बलीदान आणि पूर्णाहुतीने यागाची सांगता होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित स्वरूपात हे कार्यक्रम होत असल्याने भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.