येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

मुंबई – कदाचित् आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून प्रारंभ करावा लागेल. अद्यापही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही; पण ‘ती जाऊ नये’, असे वाटत असेल, तर कोरोनाविषयक बंधने पाळणे आवश्यक आहे. येत्या दिवसांमध्ये राज्यातील काही ठिकाणी कडक दळणवळण बंदी लागू करावी लागेल. याविषयी येत्या १-२ दिवसांत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनी ११ मार्च या दिवशी जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस घेतली. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी वरील प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘जेथे आवश्यकता असेल, तेथे दळणवळण बंदी करावी लागेल. अनावश्यक गर्दी टाळा, तसेच विनाकारण बाहेर जाणे-येणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ लावा, हात धुवा आणि सामाजिक अंतर ठेवा. लसीकरणाविषयी कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. कोरोना वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी.’’