१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

वर्ष २०१९ च्या प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये सरकारकडून देण्यात आलेल्या पैशांचा खर्च सादर न केल्याचे प्रकरण

आयकर विभाग इतका प्रामाणिक कारभार करू लागला, याचे लोकांनाच आता आश्‍चर्य वाटू लागले आहे ! भ्रष्ट लोकप्रतिनिधी, मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम काही कालावधीत कशा प्रकारे येते, हे जनतेला ठाऊक आहे; मात्र आयकर विभागाला ठाऊक नाही आणि यांपैकी काहींवरच क्वचित्च कारवाई होते. असे केवळ भारतातच घडते !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत. यात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य जगद्गुरु स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचाही समावेश आहे.

कुंभच्या काळात सरकारकडून दिलेल्या पैशांचा कसा व्यय करण्यात आला ?, याची चौकशी करण्यात येत आहे. सरकारकडून १३ आखाडे आणि ३ प्रमुख मठ यांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात आले होते. संत आणि भक्त निवास, तसेच स्वयंपाकघरासह अन्य कोणत्या कारणांसाठी किती पैसे व्यय करण्यात आले याची माहिती देण्यात आलेली नाही.